धक्कादायक - कॉलनीत लग्नाचा आणि पूजेचा जल्लोष;  नऊ पॉझिटिव्ह अन् ८४ जण होम क्वारंटाईन 

महादेव वाघमोडे
गुरुवार, 9 जुलै 2020

गुरुवारपर्यंत नऊ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आणि संपूर्ण गावांमध्ये एकच खळबळ उडाली

कोल्हापूर - गोकुळ शिरगाव येथे एसटी कॉलनीमध्ये लग्नाचा व सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम पार पडल्यानंतर या कॉलनीत गुरुवारपर्यंत नऊ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आणि संपूर्ण गावांमध्ये एकच खळबळ उडाली. हे सर्व जण या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले असल्यामुळे कॉलनीतील या कार्यक्रमांमध्ये सहभागी चोवीस कुटुंबातील 84 जनांना गुरुवारी कोरोना तपासणीसाठी सीपीआरला नेण्यात आले. या सर्वांच्या तपासणीचे रिपोर्ट अजून आले नाहीत.

दरम्यान, यापूर्वी एका दूध टँकरवरील चालकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. परंतु, तो सध्या कोरणामुक्त झाला आहे.
 गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथे कोरोनाचा कहर सुरू असून गुरुवार (ता.९) रोजी आणखीन चार व्यक्तींचे कोरोना चाचणी चे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आत्तापर्यंत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दहा झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना बाधित भाग, केआयटी कॉलेज पासून म्हसोबा माळ पर्यंतचा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून सील केला आहे.

हे पण वाचा माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्वाचे!  संभाजीराजे छत्रपती

गोकुळ शिरगाव मधील कोरोणाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी गोकुळ शिरगावचे सरपंच एम. के. पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र कणेरीचे वैद्यकीय अधिकारी भूषण मस्के , गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस नाईक राकेश माने, प्राथमिक आरोग्य केंद्र कनेरीचे कर्मचारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका विशेष परिश्रम घेत आहेत. आरोग्य कर्मचारी व आशा सेविकांकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांना कोरोणा तपासणीसाठी सीपीआरला पाठवले जात आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 84 people home quarantine in kolhapur