esakal | "बिमारी'लई झालीया, पण येणारच! ऊसतोड मजुरांच्या भावना
sakal

बोलून बातमी शोधा

90 Percent Of Sugarcane Workers Will Come Kolhapur Marathi News

ऊस तोड मजुरांच्या पट्ट्यात कोरोना प्रादुर्भाव कमी आहे. त्यापेक्षा कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग उंचावलेला आहे. याची भिती ऊस तोड मजुरांच्या मनात आहे. त्यांच्याशी चर्चा करताना ती जाणवतेही. "तुमच्याकडे बिमारी लई झालीया, पण आम्ही येणार आहे' अशा भावना ऊस तोड मजूर व्यक्त करीत आहेत.

"बिमारी'लई झालीया, पण येणारच! ऊसतोड मजुरांच्या भावना

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : ऊस तोड मजुरांच्या पट्ट्यात कोरोना प्रादुर्भाव कमी आहे. त्यापेक्षा कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग उंचावलेला आहे. याची भिती ऊस तोड मजुरांच्या मनात आहे. त्यांच्याशी चर्चा करताना ती जाणवतेही. "तुमच्याकडे बिमारी लई झालीया, पण आम्ही येणार आहे' अशा भावना ऊस तोड मजूर व्यक्त करीत आहेत. यामुळे जिल्ह्यात 90 टक्के टोळ्या दाखल होतील, असा दिलासादायक अंदाज ऊस पट्ट्यात भेट देवून आलेल्या कारखान्यांच्या प्रतिनिधींना मिळाला. 

प्रत्यक्ष ऊस तोड मजुरांच्या यवतमाळ, वाशिम व बीड जिल्ह्यात जावून आलेले आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याचे ऍग्री ओव्हरसियर विठ्ठल पाटील "सकाळ'ला तेथील अनुभव सांगत होते. गळीत हंगाम संपल्यानंतर काही महिन्यांनी ऊस तोड टोळ्या आणि वाहतूकदारांशी कारखाने करार करतात. यामध्ये बीड, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील मजुरांशीही करार असतात.

मजुरांच्या मुकादमांकडे त्याचवेळी कारखाने लाखो रूपयांचे ऍडव्हान्स देतात. हा ऍडव्हान्स प्रत्यक्ष मजुरांपर्यंत जातो की, नाही, याची खात्री करण्यासाठी हंगामाच्या एक महिना आधी कारखान्याचे प्रतिनिधी प्रत्यक्ष मजुरांच्या पट्ट्यात भेट देवून येतात. त्यात यंदा कोरोना संसर्ग असल्याने किती टोळ्या ऊस तोडीसाठी येतात याचा अंदाजही घेतला. बहुतांशी कारखान्यांचे प्रतिनिधींचा असा दौरा झाला आहे. गडहिंग्लज कारखान्याचे शेती अधिकारी सतीश पाटील यांच्यासह पाटील व इतर कर्मचारी जावून आले आहेत. 

पुसद (यवतमाळ), मानोरा (वाशिम) आणि बीड ते परभणी पर्यंतच्या ऊस तोड मजूर पट्ट्यातील 130 पैकी किमान 110 टोळ्या आणि मुकादमांशी त्यांनी संपर्क साधून बातचित केली. या पट्ट्यात गत महिन्यात मोठा पाऊस झाला आहे. या भागातील प्रमुख पीक सोयाबीन पावसाने गेले आहे. यामुळे मजुरांच्या तोंडचा घास हिरावला आहे. या परिस्थितीत मजुरांना आता ऊस तोडीशिवाय पर्याय राहिलेला नाही. कोरोना महामारी असली तरी कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी त्यांचा प्रतिसाद चांगला आहे. कोल्हापुरात कोरोना महामारी अधिक असल्याचे त्यांना कळाले आहे.

एकप्रकारची मनात भितीही आहे. परंतु, खरीप हंगामाचे पीक हाताला न लागल्याने ते हतबल झाले आहेत. शिवाय ऍडव्हान्सही सर्व मजुरांपर्यंत पोहोचला आहे. येत नाही म्हटले, तर ऍडव्हान्स परत करावा लागतो. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामारे जावे लागते. ऍडव्हान्स परत देण्यास पैसेच उपलब्ध नसतील तर कोरोना बिमारीची भिती असली तरीसुद्धा कोल्हापूरला येणार असल्याच्या भावना मजुरांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवल्याचे पाटील यांनी सांगितले. 

कारखान्यांचा जीव भांड्यात 
कोरोना महामारीमुळे यंदा ऊस तोड मजुरांच्या टोळ्या किती येतात, याबाबत कारखाना व्यवस्थापनामध्ये मोठा संभ्रम होता. ऊस क्षेत्राच्या प्रमाणात स्थानिक टोळ्यांच्या संख्येला मर्यादा येत असल्याने यंदाच्या हंगामासमोर मजूर टंचाईचे मोठे संकट उभे होते. दरम्यान, कारखान्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष मुकादम व मजुरांशी भेट देवून आल्यानंतर दिलासादायक चित्र पहायला मिळत आहे. मजुरांचा प्रतिसाद पाहून कारखान्यांचा जीव भांड्यात पडला आहे. 

संपादन - सचिन चराटी