कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाला वेग ; एअरबस अन्‌ बोईंग उतरणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्चपासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा जवळपास सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर २७ ऑक्‍टोबरपासून नियमित सुरू होणार आहे

उजळाईवाडी : येथील कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणास वेग आला आहे. नाईट लॅंडिंग, मुरूम व भराव टाकून विस्तृत धावपट्टी निर्माण करणे, आंतरराष्ट्रीय दर्जाची टर्मिनल बिल्डिंग, बागकाम अशी अनेक कामे सुरू आहेत. ही कामे मुदतीत पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांची लगबग सुरू झाली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रसामुग्री, वाहतुकीची साधने, बांधकाम साहित्य व कामगारांची वर्दळ सुरू आहे. विमानतळावर सध्या मुरूम भराव टाकून एअर स्ट्रीप अर्थात धावपट्टी बनवण्याचे काम बालाजी इन्फ्राटेक कन्स्ट्रक्‍शन प्रा.लि. व नरवीर सिंग कन्स्ट्रक्‍शनकडे आहे. टर्मिनल बिल्डिंग कन्स्ट्रक्‍शनचे काम हर्ष कन्स्ट्रक्‍शन प्रा.लि. मुंबईतर्फे सुरू आहे.

एअरबस अन्‌ बोईंग उतरणार
दरम्यान, कोल्हापूर विमानतळावर आगामी काळात मोठी एअरबस व बोईंग या कंपनीची अवाढव्य विमानेही उतरता येतील अशा दृष्टीने विमानतळाचे विस्तारीकरण सुरू असून, सध्या विमानतळावरून हैदराबाद, बेंगलोर व कोरोनामुळे तात्पुरती स्थगित झालेली तिरुपती विमानसेवा सुरू आहे व लवकरच दिल्ली व अहमदाबाद या शहरांनाही विमानसेवा उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.

आजपासून मुंबई विमानसेवा सुरू 
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्चपासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा जवळपास सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर २७ ऑक्‍टोबरपासून नियमित सुरू होणार आहे. ही विमानसेवा आठवड्यातील सलग तीन दिवस मंगळवार, बुधवार व गुरुवार अशी सुरू राहणार आहे. आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी विमान मुंबईहून कोल्हापूरसाठी टेकऑफ करेल व २ वाजून ३० मिनिटांनी कोल्हापूरमध्ये लॅंडिंग होईल. तर कोल्हापूरहून मुंबईसाठी दर मंगळवारी दुपारी ३ वाजता विमानाचे उड्डाण होणार असून ठीक ४ वाजता पुन्हा विमान मुंबईमध्ये उतरेल. तर बुधवार व गुरुवारी मात्र वेळापत्रकामध्ये बदल असून, मुंबईहून कोल्हापूरसाठी ठीक साडेबारा वाजता टेक ऑफ होणार असून, तेच विमान कोल्हापूरमध्ये १ वाजून १५ मिनिटांनी लॅंडिंग करेल. तर प्रत्येक बुधवारी व गुरुवारीही कोल्हापूरहून मुंबईसाठी दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी विमान प्रस्थान करणार असून, ते मुंबईमध्ये ३ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल.

हे पण वाचा -  सावधान ! मध्यरात्रीला चोरी होतायेत लाखोंच्या किमतीचे कारटेप  

या वर्षी ८ जूनपासून कामास सुरुवात केली असून ७ मार्च २०२१ ही अंतिम मुदत अाहे. मुदतीपूर्वीच काम पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे सक्षम यंत्रणा आहे. काम लवकरात लवकर पूर्ण करून कोल्हापूरकरांसाठी विशाल विमानतळ निर्मितीसाठी प्रयत्न करू. 
- शंभुराजे मोहिते, रिजनल डायरेक्‍टर, बालाजी इन्फ्राटेक अँड कन्स्ट्रक्‍शन प्रा. लि.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ विस्तारीकरणाच्या कामांची गती थोडी मंदावली होती; मात्र सध्या ही सर्व कामे युद्धपातळीवर सुरू असून, कामे मुदतीत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन, विमानतळ प्राधिकरण व लोकप्रतिनिधी यांचे संपूर्ण सहकार्य मिळत आहे.
- कमल कटारिया, संचालक, विमानतळ प्राधिकरण कोल्हापूर

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accelerate the expansion of Kolhapur Airport