esakal | बेदरकार वाहनचालकांवर चंदगडमध्ये दंडुका 

बोलून बातमी शोधा

Action Taken Against Careless Drivers In Chandgad Kolhapur Marathi News}

रस्त्यावर वाहन घेऊन आलेला चालक कितीही कुशल असो समोरुन आणि मागून येणारे वाहन कसे येईल याचा अंदाज बांधता येत नाही. त्या वाहनांचा चालक प्रशिक्षित की अप्रशिक्षित हे माहित नसल्यामुळे अपघात होणार नाही याचीही खात्री देता येत नाही.

kolhapur
बेदरकार वाहनचालकांवर चंदगडमध्ये दंडुका 
sakal_logo
By
अजित माद्याळे

चंदगड : रस्त्यावर वाहन घेऊन आलेला चालक कितीही कुशल असो समोरुन आणि मागून येणारे वाहन कसे येईल याचा अंदाज बांधता येत नाही. त्या वाहनांचा चालक प्रशिक्षित की अप्रशिक्षित हे माहित नसल्यामुळे अपघात होणार नाही याचीही खात्री देता येत नाही. अलिकडच्या काळात अशाच कारणांनी अपघात घडल्याची अनेक उदाहरणे आहेत. यात विनाकारण जीव गमावल्याच्या घटनाही घडल्या. विशेषतः तरुणाईचा भरधाव वेग रस्त्यावरील अन्य वाहनधारकांच्या आणि पादचाऱ्यांच्या अंगावर भितीचा काटा उभा करतो. अशा वेळी पोलिस प्रशासनाने कारवाई करावी, अशी सहज प्रतिक्रीया उमटत होती. नूतन पोलिस निरीक्षक भैरव तळेकर यांनी ही भावना ओळखून धडक कारवाई सुरू केली आहे. 

रस्त्यावरील बेदरकारपणा एकतर संबंधिताला आणि रस्त्यावरील अन्य व्यक्तींना धोकादाय ठरतो. अशा स्वभावाला लगाम कोण घालणार असा प्रश्‍न गेली काही वर्षे सर्वसामान्य नागरीकांना भेडसावत होता. नियमापेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन धावणारी वाहने, दुचाकीवर अडगळ करून बसलेले तीन प्रवाशी हे चंदगड तालुक्‍याच्या रस्त्यावर सर्रासपणे दिसणारे चित्र. बेळगाव-वेंगुर्ला या प्रमुख मार्गासह चंदगड-तिलारीनगर, पाटणे फाटा-तिलारीनगर, शिनोळी फाटा-महिपाळगड या मार्गावर तरुणाईचा वावर अधिक.

भरधाव वाहन चालवण्याची हौस पूर्ण करताना आपल्यामुळे इतरांना त्रास होईल ही भावनाच नसल्यामुळे सुरक्षित प्रवास करणाऱ्या इतरांच्या मनात भिती. या तरुणांच्या अतिउत्साहीपणाचा अनेकांना फटका बसलेला. त्यामुळे पोलिसांनी अचानकपणे कारवाई करुन अशा वाहनधारकांवर जरब बसवावा, अशी मागणी होत होती. पोलिस निरीक्षक तळेकर यांनी गेले दोन दिवस कारवाई सुरू केल्यामुळे नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे.

ट्रॅक्‍टर चालवण्याचा परवाना नसताना तसेच ट्रॉली पासिंग करुन न घेता त्यातून वाहतूक केल्या प्रकरणी डुक्करवाडी येथील एकवर गुन्हा नोंद केला. त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता 15 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्याशिवाय वाहन चालवण्याचा परवाना नसणाऱ्या मुलाकडे दुचाकी चालवायला देणारे पालक, दुचाकीवर टिब्बलसीट फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. 

सर्वांचीच मागणी होती
वाहतुकीचे नियम न पाळणे आणि बेदरकारपणे अत्यंत वेगवान वाहने चालवणे यातून अपघात घडतात. त्याला आळा घालावा, अशी सर्वांचीच मागणी होती. त्यामुळे या कारवाईला सुरवात केली आहे. 
- भैरव तळेकर, पोलीस निरीक्षक, चंदगड 

संपादन - सचिन चराटी
kolhapur