गडहिंग्लज बाजार समितीसाठी अडकूरच्या देसाईंची शिफारस

अजित माद्याळे
Saturday, 31 October 2020

गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासकीय मंडळांसाठी 21 अशासकीय सदस्यांच्या नावांची यादी पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी (ता. 29) सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सादर केली.

गडहिंग्लज : गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासकीय मंडळांसाठी 21 अशासकीय सदस्यांच्या नावांची यादी पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी (ता. 29) सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सादर केली. तसेच या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्ष पदासाठी अडकूर (ता. चंदगड) येथील अभय देसाई यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. 

प्रशासकीय मंडळात महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि स्वाभिमानी या पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांची नावे समाविष्ट केली आहेत. सहकार क्षेत्रातील सर्वच संस्थांच्या निवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलल्याने संचालक मंडळ बरखास्त करून त्याठिकाणी प्रशासकीय मंडळ नियुक्तीचा निर्णय झाला. त्यामुळे निवडणुकापर्यंत आता हेच मंडळ बाजार समितीचे कामकाज पाहणार आहे.

मंडळातील सदस्य पदासाठी सुचवलेल्या नावात मुंकुदराव देसाई, जयकुमार मुन्नोळी, भीमराव राजाराम, जानबा चौगुले, धनाजी तोरस्कर, सोमगोंडा आरबोळे, रोहित मांडेकर, राजशेखर यरटे, विक्रम चव्हाण-पाटील, संजय उत्तूरकर, ऍड. दिग्विजय कुराडे, सुनील शिंत्रे, संभाजी पाटील, प्रभाकर खांडेकर, संभाजी भोकरे, दिलीप माने, लगमाण्णा कांबळे, संपत देसाई, राजेंद्र गड्डयान्नावर, विजय वांगणेकर यांचा समावेश आहे. पालकमंत्री पाटील यांनी दिलेल्या या यादीला सहकार मंत्री पाटील यांच्याकडून मंजुरी देऊन रितसर नियुक्ती होणार असल्याचेही सांगण्यात आले. 

चव्हाण, जोशी नियोजन मंडळावर 
माजी सभापती अमर चव्हाण (चन्नेकुप्पी) व गडहिंग्लजचे नगरसेवक हारूण सय्यद हे दोघेही संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. यामुळे या पदासाठी चंदगड व कागल मतदारसंघात रस्सीखेच सुरू झाल्याने अद्याप निवड प्रलंबित आहे. दरम्यान, आता चव्हाण यांच्यासह जिल्हा मजूर संघाचे माजी जिल्हाध्यक्ष उदयराव जोशी यांना जिल्हा नियोजन मंडळावर, तर माजी जि. प. सदस्य शिवप्रसाद तेली यांना खनिज महामंडळावर संधी मिळणार असल्याचे खात्रीलायक सूत्राकडून समजते. 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adakur's Desai's Recommendation For Gadhinglaj Market Committee Kolhapur Marathi News