
कोल्हापूर : येणाऱ्या काळात कृषी आणि कृषीपुरक उद्योग, प्रक्रिया उद्योग यांना सध्या मोठी संधी आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील काजू, उस, गूळ, भाजीपाल्यापासून ते जंगलातील औषधी वनस्पती यावर प्रक्रिया करुन शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन भारत सरकारच्या स्टार्टअप उपक्रमातील कृषी विभागाचे सल्लागार डॉ.परशराम पाटील यांनी केले."कॉफी वुईथ सकाळ' या उपक्रमात त्यांनी संवाद साधला. "सकाळ'चे निवासी संपादक निखिल पंडितराव उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, देशात पहिल्यांदा 2018 सालात सर्वसमावेश कृषी निर्यात धोरणाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. भारतापेक्षा छोटे छोटे देश कृषी उत्पादनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात अग्रगण्य स्थानावर आहेत. भारतातही मोठी क्षमता असताना नियोजन नसल्याने या क्षेत्रात आपण मागे आहोत. मात्र हळूहळू परिस्थिती बदलत आहे. शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी लागेल ती मदत शासनाकडून विविध पातळीवर करण्यात येते. भारत हा मसाला निर्यात करणारा प्रमुख देश आहे. याचपध्दतीने अनेक पिकांत, कृषी उत्पादनांत जगात अग्रेसर राहण्याची क्षमता भारतात आहे. देशातील 70 टक्के लोक आज शेती क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र या शेतीला पुरक व्यवसाय, तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे.
शेतीतही आता डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर सुरु झाला आहे. माती, पाणी, हवामान याचा अभ्यास करुन पिकांची, बियाणे निवड, रोगराई, उत्पादनाची गुणवत्ता येथून ते उत्पादनाला जगाच्या कोणत्या देशात किती मागणी आहे, याची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे. याचा फायदा शेतकऱ्यांनी करुन घ्यावा. आपल्याकडे शेतीचे छोटे छोटे तुकडे आहेत. लहान शेतकऱ्यांना या सर्व गोष्टी करणे शक्य नसल्याने शेतकरी उत्पादक गट किंवा कंपनी स्थापन करुन या शेतीला चांगल्या पध्दतीने चालना देण्यास वाव आहे. यासाठी कृषी विभागाने मेहनत घ्यावी लागेल, अशी सुचनाही त्यांनी केली.
सेंद्रीय गूळ उत्पादनातूनच
जी.आय.मानांकन टिकेल
कोल्हापूर जिल्ह्यातील काजू, गूळ व मध जगात भारी आहे. गुळाला तर आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी जी.आय.मानांकन मिळाले आहे. मात्र हे मानांकन टिकवण्याची जबाबदारीही शेतकऱ्यांची आहे. केवळ गूळ तयार करतानाच नव्हे तर यासाठीचा जो उस येतो, त्याचे उत्पादनही सेंद्रीय होणे आवश्यक आहे. असे झाले तरच परदेशी बाजारपेठेत कोल्हापुरचा गूळ व जी.आय.मानांकन टिकणार असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले.
डॉ.परशराम पाटील म्हणाले...
* मध, फणस, रताळ्यांवर प्रक्रिया आवश्यक
* मार्केटिंग करताना पश्चिम घाटाचा संदर्भ हवा
* कृषि विभागाने अद्ययावत माहिती ठेवावी
* शेतीत डिजीटल साधनांचा वापर करावा
* गट शेती ही काळाची गरज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.