इचलकरंजीत रुग्णवाहिकेअभावी रुग्णांची परवड

ऋषिकेश राऊत
Saturday, 19 December 2020

आयजीएम रुग्णालयात 108 रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने दोन गंभीर रुग्णांना ताटकळत बसावे लागले.

इचलकरंजी : आयजीएम रुग्णालयात 108 रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने दोन गंभीर रुग्णांना ताटकळत बसावे लागले. आयजीएममध्ये सोयी-सुविधांचा अभाव असल्याने या गंभीर रुग्णांना इतर ठिकाणी उपचाराचा सल्ला देण्यात आला; मात्र डॉक्‍टर व ड्रायव्हर नसल्याने रुग्णवाहिकाही नाकारण्यात आली. या विरोधात माणुसकी फौंडेशनने आयजीएम प्रवेशद्वारावरच ठिय्या मारत निर्दशने केली. 

गुरुवारी (ता. 17) रात्री आठ वाजता गणेशनगरमधील गंभीर जखमी झालेल्या एका निराधार व्यक्तीला माणुसकी फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी उपचारासाठी आयजीएममध्ये दाखल केले. या गंभीर व्यक्तीवर पुढील उपचारांची सोय नसल्याचे सांगत सांगली सिव्हिल रुग्णालयात त्याला हलवण्यास सांगितले. यासाठी आयजीएममधील 108 रुग्णवाहिकाची मदत मागितल्यानंतर डॉक्‍टर व ड्रायव्हर नसल्याने रुग्णवाहिका नाकारण्यात आली. हुपरी व हातकणंगले येथील रुग्णवाहिकेबाबत असेच उत्तर मिळाले; मात्र कार्यकर्त्यांनी त्या रुग्णाला खासगी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी सकाळी पुन्हा अब्दुललाट येथील गंभीर रुग्णाबाबत असाच प्रत्यय आला. दोन गंभीर रुग्णांना अशीच वागणूक मिळाल्याने माणुसकी फौंडेशनचे कार्यकर्ते आक्रमक झाले. 

त्यांनी आयजीएम प्रवेशद्वारावर ठिय्या मारत आयजीएम रुग्ण सेवेचा निषेध केला. तसेच जोरदार निदर्शने केली. ठिय्या मारत वैद्यकीय अधीक्षक, प्रशासकीय अधीक्षकांना धारेवर धरले. महत्त्वाचे म्हणजे अत्याधुनिक सोयी-सुविधांचे नुसते गाजर दाखवत रुग्णालयात सोयी-सुविधा शून्य आहेत. आता आश्‍वासने न देता रुग्ण सेवेची हमी द्या, अन्यथा जनआंदोलन उभे करू, असा संतप्त इशारा त्यांनी आयजीएम प्रशासनाला दिला. प्रवेशद्वारावरील या गोंधळामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

अखेर जयसिंगपूरची रुग्णवाहिका धावली 
शुक्रवारी सकाळी गंभीर रुग्णाची प्रकृती लक्षात घेता माणुसकी फौंडेशनने जयसिंगपुरातील 108 रुग्णवाहिकेला पाचारण केले. त्वरित ही रुग्णवाहिका आयजीएममध्ये दाखल झाली आणि गंभीर रुग्णाला त्यांनी सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवले. 

गणेशनगरमधील निराधाराचा दुर्दैवी मृत्यू 
गुरुवारी रात्री 108 रुग्णवाहिका न मिळाल्याने माणुसकी फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गणेशनगरमधील निराधाराला सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र वेळीच उपचार न झाल्याने निराधार रुग्णाचा शुक्रवारी दुपारच्या सुमारास मृत्यू झाला. 

विषय आयजीएमच्या नियंत्रणाखाली नाही
आयजीएममध्ये अनेक सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना इतर ठिकाणच्या उपचाराचा सल्ला दिला जातो. 108 रुग्णवाहिकेचा विषय आयजीएमच्या नियंत्रणाखाली नाही; मात्र यासाठी नक्की पाठपुरावा करू. 
- डॉ. नंदकुमार पोकरकर, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Affordability Of Patients Without Ambulance In Ichalkaranji Kolhapur Marathi News