esakal | नगराध्यक्षांच्या दालनात कचऱ्याचा धूर
sakal

बोलून बातमी शोधा

agitation in front of the mayor office ichalkaranji

इचलकरंजीतील नागरिक संतप्त; ठोस उपाययोजना न केल्यास ठिय्या आंदोलन

नगराध्यक्षांच्या दालनात कचऱ्याचा धूर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : कचरा डेपोला सातत्याने लागणाऱ्या आगीबाबत दहा वर्षांपासून पाठपुरावा करतोय. पालिकेने कोणत्या ठोस उपाययोजना केल्या सांगा, अशा संतप्त भावना आसरानगर परिसरातील नागरिकांनी आज व्यक्त केल्या. याबाबत १ डिसेंबरपर्यंत ठोस उपाययोजना न केल्यास नगराध्यक्षांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलनाचा इशाराही दिला.

आसरानगर परिसरात असलेल्या कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरतात. अनेक दिवसांपासून आग धुमसत आहे. त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. श्‍वसनाच्या आजाराने नागरिक हैराण आहेत. या पार्श्‍वभूमीवर आज परिसरातील नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढून नगराध्यक्षा अलका स्वामी यांना निवेदन दिले.

हेही वाचा- नविन वर्षात कर्नाटकात सफर करा आता नविन बसमधून
पालिकेकडून ठोस उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. मक्तेदाराला वर्क ऑर्डर न दिल्यामुळे कामे रखडल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले. याबाबत नगरसेवक शशांक बावचकर यांनी जाब विचारला. तातडीने वर्क ऑर्डर देऊन सोमवारपासून उपाय योजनांच्या कामाला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले. नगराध्यक्षा स्वामी यांनी आग विझविण्याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. चर्चेत नगरसेवक बावचकर, राहुल खंजीरे, संजय केंगार, विठ्ठल चोपडे, नगरसेविका सुनिता शेळके, डॉ. आरती कोळी, अमृता कोळी, शेखर पोवार, प्रदीप घोरपडे, हारुण खलिफा आदींनी सहभाग घेतला.

नागरिकांनी केलेल्या मागण्या
  आग विझविण्यासाठी पाण्याची व्यवस्था 
  २४ तास रखवालदार नियुक्ती 
  डेपोभोवती संरक्षण भिंत 
  डेपो परिसरात सीसीटीव्ही


वादावादीने तणाव
नगराध्यक्ष स्वामी यांच्या दालनातील चर्चेवेळी नगरसेवक केंगार आणि हारून खलिफा यांच्यासह नगरसेवक खंजिरे व नागरिक यांच्यात वादावादी झाली. त्यामुळे तेथे किरकोळ तणाव निर्माण झाला होता.

संपादन- अर्चना बनगे