मराठा आरक्षणासाठी इचलकरंजीत उपोषण

पंडित कोंडेकर
Tuesday, 6 October 2020

मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती शासनाने उठवावी आणि त्वरित आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.

इचलकरंजी : मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती शासनाने उठवावी आणि त्वरित आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. विविध संघटना, राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी या मागणीला पाठिंबा देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी बळ दिले. 

सध्या मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना इचलकरंजीतही ठोक मोर्चा काढला. तसेच सोमवारी प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आरक्षणासाठी शासनाला साकडे घातले. मराठा समाज बांधव शिवाजी पुतळा चौकात एकत्र येऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तेथून मुख्य मार्गावरून प्रांत कार्यालयासमोर मराठा आरक्षणासाठी घोषणा देत उपोषणस्थळी दाखल झाले.

जिल्हा हज कमिटी, छोटे व्यापारी, फेरीवाला पथविक्रेता संघटना, शिक्षक संघटना, बार असोसिएशन, भाजप, युगंधरा फौंडेशन, मनसे, युवा सेना, शिवसेना आदींनी उपोषणस्थळी भेट देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भावना व्यक्त केल्या. उपोषणात मराठा समाजातील डॉक्‍टर, शिक्षक, खेळाडू यांचा सहभाग अग्रणी होता. 

नगरसेवक, आजी माजी आमदार, खासदार यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत लाक्षणिक उपोषणाला भेट दिली. मराठा आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी सनदशीर मार्गाने संयमाची लढाई पुढे घेऊन जाऊया आणि हक्काचे आरक्षण मिळवूया, शासन दरबारी तुमचा सेवक म्हणून योग्य भूमिका मांडणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले. आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार राजूबाबा आवळे, मदन कारंडे आदींनी मनोगत व्यक्त केले. 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation In Ichalkaranji For Maratha Reservation Kolhapur Marathi News