पारगड रस्त्याप्रकरणी आंदोलन सुरुच 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

मोर्ले-पारगड रस्त्यासाठी पारगड पंचक्रोशी समितीतर्फे कालपासून सुरू करण्यात आलेले बेमुदत उपोषण आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरुच राहिले. आंदोलक रघुवीर शेलार यांची प्रकृती आज खालावली. सायंकाळी शासनाच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंदोलकांची तपासणी केली. यात शेलार यांचा रक्तदाब वाढल्याचे स्पष्ट झाले. 
मोर्ले-पारगड रस्त्याचे कोल्हापूर हद्दीतील दोन किलो मीटरचे काम वन विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे थांबले असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

चंदगड : मोर्ले-पारगड रस्त्यासाठी पारगड पंचक्रोशी समितीतर्फे कालपासून सुरू करण्यात आलेले बेमुदत उपोषण आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरुच राहिले. आंदोलक रघुवीर शेलार यांची प्रकृती आज खालावली. सायंकाळी शासनाच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंदोलकांची तपासणी केली. यात शेलार यांचा रक्तदाब वाढल्याचे स्पष्ट झाले. 
मोर्ले-पारगड रस्त्याचे कोल्हापूर हद्दीतील दोन किलो मीटरचे काम वन विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे थांबले असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

प्रादेशिक वन विभागाने या रस्त्याचे काम करण्यास मंजूरी दिली असली तरी कोल्हापूर विभागाच्या वन अधिकाऱ्यांकडून आडकाठी आणली जात असल्याचा आरोप आहे. दोन किलो मीटरच्या या भागात जंगल विरळ आहे. शिवाय वरीष्ठ कार्यालयाने त्याला मंजुरी दिली आहे. परंतु काही अधिकाऱ्यांच्या विरोधामुळे कोल्हापूर, सिंधुदूर्ग आणि गोव्याला जोडणारा हा जवळचा मार्ग रखडला आहे.

ऐतिहासिक पारगडच्या पर्यटन विकासाला चालना देणारा हा मार्ग व्हावा यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्य वन संरक्षकांनी दिलेल्या पत्राचा आधार घेऊन चंदगड वन विभागाला पत्र दिले. त्यात 3 मार्च पासून काम सुरु करण्याचे आश्‍वासन दिले असून उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.

परंतु वन विभागाचे काही आक्षेप असल्यास 2 मार्चपर्यंत कळवावे, असेही पत्रात म्हटले आहे. त्यावर आंदोलकांचा आक्षेप आहे. या मुद्याचा आधार घेऊन वन विभागाने पुन्हा आडकाठी आणली तर बांधकाम विभाग काय करणार असा प्रश्‍न करुन आंदोलकांनी आंदोलन सुरुच ठेवले आहे. 

दरम्यान, ज्येष्ठ आंदोलक शेलार यांची उपोषणामुळे आज प्रकृती खालावली. त्यांचा रक्तदाबही वाढला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना रक्तदाबाच्या गोळ्या घेण्याची सुचना केली असली तरी पोटात अन्न नसल्याने गोळ्या खाण्याला मर्यादा आल्या आहेत. परंतु जोपर्यंत रस्त्याला रितसर मंजुरी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार, असा पवित्रा शेलार यांनी घेतला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The agitation for the Pargad road Kolhapur Marathi News