तरूणाने नदीतील दगडी दीपमाळेवरून पाण्यात उडी मारताच पोलीसांच्या उरात भरली धडकी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

प्रतिकात्मक जलसमाधी घेऊन आंदोलन 

कोल्हापूर : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी न्यायालयाची जुनी इमारत निषेधार्थ नागरी कृती समितीच्या वतीने आज पंचगंगा घाट परिसरात प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. नदीतील दगडी दीपमाळेवरून उडी मारून एका तरूणाने जलसमाधी घेतल्याचे भासवून राज्याच्या मुख्य सचिवांचा यावेळी निषेध करण्यात आला. पंचगंगा घाट परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. सीपीआरसमोरील न्यायालयाची जुनी इमारत कोरोना उपचाराला द्यावी अशी मागणी होती. मुख्य सचिव संजयकुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र देऊन इमारत वैद्यकीय उपचारासाठी देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे निर्णय देणे योग्य नाही. कोरोनाच्या आपत्कालीन स्थितीत सर्वच जण काम करत आहेत. उपचारासाठी रुग्णालये कमी पडत असल्याने न्यायालयाच्या इमारतीच्या मागणी केली होती. ती नाकारली गेल्याने आंदोलन झाले. नदीपात्रात आंदोलन होणार असल्याने पोलिसांनी सकाळपासून बंदोबस्त तैनात केला होता महापालिका अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात होता. आंदोलक नदीपात्राकडे जाणार नाहीत याची खबरदारी पोलिसांनी घेतली. 

हेही वाचा- कोल्हापुरात आरोग्य जागर : घरात कोणी आजारी आहे का?

दुपारी साडेबाराच्या सुमारास नागरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत मुख्य सचिव संजयकुमार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. माणसे मरत असताना उपचारासाठी इमारत नाकारणे योग्य नाही. संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आला. 

एकीकडे घोषणाबाजी सुरू असताना दूसरीकडे नदीतील दीपमाळेवर तरूण कार्यकर्ता पाण्यातून पोहतच माळेवर जाऊन बसला. तो उडी तर मारणार नाही याची पोलिसांनी धास्ती घेतली. हा तरूण प्रतिकात्मक संजयकुमार आहेत. त्याने जलसमाधी घ्यावी अन्यथा आम्ही पाण्यात ढकलून देऊ असा इशारा आंदोलकांनी दिल्यानंतर तरूणाने पाण्यात उडी मारली. पोलिस तसेच अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ उडाली. तरूण पुन्हा पोहत सुखरूपपणे बाहेर आला. 

हेही वाचा- भांडाफोड : अखेर व्हिजन आले गोत्यात ; खुडेचा पर्दाफाश

अशोक पोवार यांनी निवेदनाचे वाचन करून आंदोलन नेमके कशासाठी आहे याची माहिती दिली. रमेश मोरे, दिलीप देसाई, रामभाऊ कोळेकर,उदय भोसले. सुनील मोहिते. राजेश वरक,उत्तम वंदूरे, संभाजीराव जगदाळे, चंद्रकांत सुर्यवंशी, श्रीकांत भोसले, महादेव पाटील, परवेझ सय्यद, भाऊ सुतार, सुभाष देसाई, लहूजी शिंदे.आदि आंदोलनात सहभागी झाले. 

त्या तरूणाची अशीही दिशाभूल 
ज्या तरूणाने नदीत उडी मारली त्यास पाण्यात नुसती उडी मारायची असे सांगून त्यास दीपमाळेवर जाण्यास सांगितले गेले. पोलिसांनी नंतर तरूणाची नेमके कुठे राहतो याची विचारणी केली. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यास पुढे नोकरीबाबत अडचणी येऊ शकतात त्यामुळे तरूणाच्या नावाचा उल्लेख नको अशी विनंती तरूणाच्या वडिलांनी केली. 

संपादन -  अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation with symbolic water for Protesting the old court building for the treatment of corona patients