गडहिंग्लजला रब्बीचे क्षेत्र एक हजार हेक्‍टरने घटले

The Agricultural Area At Gadhinglaj Was Reduced By One Thousand Hectares Kolhapur Marathi Nrews
The Agricultural Area At Gadhinglaj Was Reduced By One Thousand Hectares Kolhapur Marathi Nrews

गडहिंग्लज : रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू व इतर कडधान्यांची पेरणी यंदा गतवर्षीपेक्षा एक हजार हेक्‍टरनी घटली आहे. ऑक्‍टोबर-नोव्हेंबरपर्यंत परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीने जमिनीत असलेल्या ओलाव्यामुळे शेतकऱ्यांना हंगामच साधता आला नाही. त्यामुळे रब्बी पेरणीला त्याचा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळते. या परिस्थितीत रब्बी पेरणी न झालेल्या क्षेत्रापैकी 50 टक्‍क्‍यांहून अधिक जमीन पुढील पावसाळ्यापर्यंत पडीक राहणार असल्याचे सांगण्यात आले. 

तालुक्‍यातील हिरण्यकेशी आणि घटप्रभा या दोन नद्या आणि पाझर तलावांचा परिसर वगळता इतर क्षेत्र कोरडवाहू आहे. बागायतीपेक्षा कोरडवाहू क्षेत्रात रब्बीचे क्षेत्र अधिक असते. खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर शेतकरी रब्बीच्या तयारीला लागतात. यंदाही पावसाळा चांगला झाला. पिके जोमदार आली; परंतु पिकांच्या काढणीवेळी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. मिळेल ते पदरात पाडून घेत शेतकरी रब्बीच्या तयारीला लागले; परंतु परतीचा पाऊस जोरदार झाल्याने जमिनीमध्ये ओलावा अधिक होता. विशेषत: ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात रब्बीचा हंगाम साधला जातो; परंतु यंदाच्या परतीच्या पावसाने झालेल्या ओलाव्यामुळे हा हंगामच साधता आला नाही. ज्या जमिनीत वाफसा आला, त्या ठिकाणी रब्बीची पेरणी झाली. काही ठिकाणी रब्बी ज्वारी पेरल्यानंतर उगवणही झाली नाही. दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली. 

रब्बीचा हंगाम वेळेत न साधल्याने या हंगामातील पेरणी एक हजार हेक्‍टरने घटली आहे. घटलेल्या एक हजारपैकी 200 ते 300 हेक्‍टर क्षेत्रात उसाची लागवड होऊ शकते. रब्बी पेरणी अधिकाधिक कोरडवाहू क्षेत्रात होत असते. त्यामुळे माळरानावरील कोरडवाहू जमिनीत हंगाम उलटून गेल्यानंतर पाण्याअभावी काहीच करता येत नाही. परिणामी ही जमीन आता पुढील पावसाळ्यापर्यंत पडीक राहणार आहे. अशा परिस्थितीत रब्बी पिकांतून मिळणाऱ्या काहीशा उत्पन्नालाही शेतकऱ्यांना मुकावे लागले. एकीकडे परतीच्या पावसाने खरीप पिके हिरावून नेली आणि दुसऱ्या बाजूला जमिनीतील ओलाव्यामुळे हंगाम साधता न आल्याने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com