esakal | शेतीमाल आवक, पण माथाडीं कामगारांचा तुटवडा 
sakal

बोलून बातमी शोधा

Agricultural Commodities Are Coming In, But There Is A Shortage Of Skilled Workers Kolhapur Marathi News

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशभर लॉकडाउन असला तरी शेतीमालाची वाहतूक करण्यास परवानगी आहे. त्यामुळे शेतीमाल पुरेशा संख्येने जिल्ह्यात येत आहे; मात्र त्या मालाची चढ-उतार करण्यासाठी माथाडी कामगारांची संख्या निम्म्यापेक्षा कमी आहे. शहरात जवळपास साडेसातशे माथाडींची गरज असताना अवघे 300 वर माथाडी कामगार उपलब्ध होत आहेत. अशा अपुऱ्या मनुष्यबळामुळे अडचणी येत असून त्यातून धान्य बाजारपेठेतील उलाढालीला मर्यादा येत आहेत. 

शेतीमाल आवक, पण माथाडीं कामगारांचा तुटवडा 

sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर ः कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशभर लॉकडाउन असला तरी शेतीमालाची वाहतूक करण्यास परवानगी आहे. त्यामुळे शेतीमाल पुरेशा संख्येने जिल्ह्यात येत आहे; मात्र त्या मालाची चढ-उतार करण्यासाठी माथाडी कामगारांची संख्या निम्म्यापेक्षा कमी आहे. शहरात जवळपास साडेसातशे माथाडींची गरज असताना अवघे 300 वर माथाडी कामगार उपलब्ध होत आहेत. अशा अपुऱ्या मनुष्यबळामुळे अडचणी येत असून त्यातून धान्य बाजारपेठेतील उलाढालीला मर्यादा येत आहेत. 

शहरातील रेल्वे गुडस्‌, शाहू मार्केट यार्ड, लक्ष्मीपुरी धान्य बाजार यांसह पेठवडगाव, गडहिंग्लज, मलकापूर येथील बाजारपेठेत घाऊक किराणा माल बाजार भरतो. येथे किरकोळ विक्रेते खरेदी करतात. गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाउन सुरू असला तरी शेतीमाल वाहतुकीला परवानगी असल्याने शेतीमालाची वाहतूक सुरू झाली आहे. कोल्हापुरात मराठवाड्यातून विशेषतः बार्शी, लातूर भागांतून ज्वारी व डाळीची आवक होत आहे.

हा माल कोल्हापुरातील धान्य बाजारात येतो. येथे माथाडी कामगार निम्मेच आहेत. त्यांच्याकडून या मालाची चढ-उतार केली जाते. ती पूर्ण क्षमतेने होत नाही, तर रेल्वे गुडस्‌मध्ये काम करणारे निम्म्याहून अधिक माथाडी कामगार सोलापूर व कर्नाटक सीमाभागात अडकून पडले आहेत. त्यांना दोन जिल्हे ओलांडून कोल्हापुरात येणे शक्‍य नाही. त्यामुळे जेवढे माथाडी कामगार कोल्हापुरात राहतात तेच कामावर आहेत. त्यामुळे जेमतेम मालाची चढ-उतार होते. परराज्यात जाणारा शेतीमाल गाडीत भरण्यासाठी माथाडी कामगारांची संख्या कमी असल्याने ट्रकचालकांना थांबून राहावे लागत आहे. अशी स्थिती शाहू मार्केट यार्ड, शाहूपुरी रेल्वे गुडस्‌ येथे आहे. 

शासकीय धान्य गोदामात तांदूळ, गहू, ज्वारी अशी आवक होत आहे. काही आवक होणार आहे. त्यासाठी शासकीय स्तरावर 150 वर माथाडी कामगारांची उपलब्धता झाली आहे. त्यांच्याकडून सध्या शासकीय धान्य पुरवठा रेशन दुकानापर्यंत झाला आहे. त्यामुळे रेशनवर धान्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध केले जात आहे. 

जिल्ह्यातील ग्रामीण बाजारपेठेतही थोड्याफार फरकाने निम्मेच माथाडी कामगार कामावर आहेत, तर गांधीनगर बाजारपेठही बंद असल्याने येथे जवळपास 90 टक्के माथाडी कामगार कामावर नाहीत. असे असले तरी जवळपास 550 हून अधिक माथाडी कामगार सध्या कामावर नसल्याने त्यांचा रोजगार बुडाला, तर धान्य व शेतीमालाच्या वाहतुकीला विलंब होत असल्याने अर्थकरणावरही त्याचा परिणाम होत आहे. 

लॉकडाउन उठवल्यानंतरच स्थिती पुर्वपदावर
माथाडी कामगार बाहेरच्या जिल्ह्यात राहणारे आहेत. ते त्यांच्या गावी अडकले आहेत. स्थानिक माथाडी कामगारांच्या भरवशावर सध्या शेतीमाल चढ-उताराचे काम केले जात आहे. लॉकडाउन उठवल्यानंतरच माथाडी कामगार पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील, अशी स्थिती आहे. 
- कृष्णात चौगुले, जिल्हाध्यक्ष, हमाल पंचायत.