आजऱ्यात सहा कोटींची कर्जमाफी 

रणजित कालेकर
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

आजरा तालुक्‍यातील शेतकऱ्यांना 5 कोटी 84 लाख 93 हजार 517 रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत खातेदार शेतकऱ्यांची माहिती जिल्हा बॅंकेच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे.

आजरा : आजरा तालुक्‍यातील शेतकऱ्यांना 5 कोटी 84 लाख 93 हजार 517 रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत खातेदार शेतकऱ्यांची माहिती जिल्हा बॅंकेच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. तालुक्‍यातील 94 विविध कार्यकारी सेवा संस्थेचे 1715 खातेदार यासाठी पात्र ठरल्याचे सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. यामध्ये राष्ट्रीयकृत बॅंकेकडील थकबाकीदार पात्र कर्जदारांची माहिती उपलब्ध झाल्यानंतर आकडा आणखीन वाढणार असल्याचे सांगण्यात येते. 

महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्यशासनाने जाहीर केला होता. जिल्हा बॅंक, सेवा संस्था व राष्ट्रीयकृत बॅंकांना याबाबतचे निर्देश दिले गेले होते. गेली दोन महिने याबाबतची माहिती जमा करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू होते. आजरा तालुक्‍यातील 108 सेवा संस्थामध्ये कर्जदार खातेदार शेतकऱ्यांची माहिती जमा करण्याचे काम चालू होते. यामध्ये 1715 थकबाकीदार कर्जदार कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत.

दोन लाखांच्या आतील थकबाकीदार कर्जदारांना कर्ज माफी दिली जाणार आहे. त्यामुळे 1 एप्रिल 2015 ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंत दोन लाख रुपयांपर्यंत थकीत कर्जदारांची छाननी करून त्यामध्ये पात्र ठरलेल्या खातेदार शेतकऱ्यांची यादी सेवा संस्थानी तयार केली. ही यादी जिल्हा बॅंकेच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. 5 कोटी 84 लाख 93 हजार 517 रुपये कर्जमाफीची रक्कम जिल्हा बॅंकेच्या वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहे. दोन लाखांवर कर्ज घेतलेल्या थकबाकीदार कर्जदारांचा यामध्ये समावेश नाही. आजरा तालुक्‍यात राष्ट्रीयकृत बॅंकेच्या पाच शाखा व ग्रामीण बॅंकेची एक शाखा कार्यरत असून याची माहिती उपलब्ध झाल्यास हा आकडा वाढू शकतो. 

पिककर्ज व पुर्नगठीत कर्जाचा विचार 
कर्जमाफीसाठी शासनाने पिक कर्ज व पुर्नगठीत केलेल्या कर्जांचा विचार केला आहे. आजरा तालुक्‍यात पुर्नगठीत कर्जाचा प्रकार नाही. त्यामुळे पिक कर्जाचा समावेश कर्जमाफीमध्ये अधिक असल्याचे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ajara 6 crore loan waiver Kolhapur Marathi News