कोरोनाने लावली वाट, कर्ज काढून पिकवलेली जरबेराची फूले चाललीत ऊकिरड्यावर...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

त्यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्ज काढून हे ग्रीन हाऊस उभे केले आहे.  जोतिबा डोंगराकडे पाय जाणाऱ्या पाऊतका  परिसरात  डोंगर फोडून त्यांनी ही पॉली हाऊस उभे केले आहे.

जोतिबा डोंगर - कोरोना व्हायरसच्या इफेक्टमुळे पोहाळे तर्फ आळते ता. पन्हाळा येथील पंढरीनाथ मोरे व नंदकुमार चौगले या शेतकऱ्यांना जरबेरा फुले दररोज ऊकिरड्यावर टाकायची वेळ आली आहे. या दोन शेतकऱ्यांनी पॉलिहाऊसद्वारे दीड एकर शेतीमध्ये जरबेरा फुल शेती केली आहे. पंढरीनाथ मोरे यांनी तर गेल्या चार महिन्यापासूनच ही फूल शेती सुरू केली असून अवघ्या चौथ्या महिन्यातच त्यांना यंदा कोरोनाव्हायरसमुळे  आर्थिक फटका बसला आहे.

त्यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्ज काढून हे ग्रीन हाऊस उभे केले आहे.  जोतिबा डोंगराकडे पाय जाणाऱ्या पाऊतका  परिसरात  डोंगर फोडून त्यांनी ही पॉली हाऊस उभे केले आहे. ऊस ज्वारी भुईमूग मका सोयाबीन या पारंपरिक पिकाकडे न वळता प्रगतशील शेती म्हणून मोरे यांनी जरबेरा शेती करण्याचे ठरवले आणि माळरानातच हा प्रयोग यशस्वी केला.

गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांनी फुले तोडणी सुरू झाली .  त्यांची जरबेरा फुले एक दिवसा आड हैदराबाद मुंबई या ठिकाणी जाऊ लागलीत. चालू बाजार भावाप्रमाणे या फूलांना ऑनलाईन भाव मिळतो. एक दिवस आड दहा ते अकरा हजार रुपये त्यांना त्यांच्या शेतीत भाव मिळत होता पण गेल्या दहा दिवसापासून कोरोना व्हायरसचा फटका त्यांना बसला आणि आख्या बागेतील फुले तोडून  टाकायची वेळ त्यांच्यावर आली आहे. उकीरंड्यावर टाकलेली फूले पाहून काही शेतकरी हळहळ व्यक्त करीत आहेत. लहान मुलांची फुले गोळा करण्यासाठी झुंबड उडाली आहे .

 जरबेरा या फुलांना लहान मुलाप्रमाणे जपावे लागते. वेळोवेळी औषध फवारणी आंतर मशागत ही कामे दररोज करावी लागतात. त्यासाठी चार महिला व दोन गडी यांच्याकडून ही कामे  करून घ्यावी लागतात. दररोज त्यांना मजूरी द्यावी लागते. त्यामुळे दहा-बारा दिवसापासून जरबेरा फुल शेती  तोट्यात येवू लागली आहे. 

नंदकुमार चौगले यांची ही जरबेरा फुल बाग गेल्या तीन-चार वर्षांपासून असून त्यांनीही भैरोबा दरा या परिसरात डोंगर फोडूनच या ठिकाणी फुलमळा फुलविला आहे. त्यांना ही यंदा मोठा फटका बसला आहे. या दोन शेतकऱ्यांना डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे .कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर सर्व वाहतूक व्यवस्था सूरळीत झाल्यावरच या फुलांना बाजार पेठ मिळणार आहे. निदान एक दोन एप्रिल नंतरच पुढील दिशा  समजेल. तो पर्यंत या फूलांचा आर्थिक फटका मोरे व चौगले यांना सोसावा लागणार आहे .

ऊत्पादनाचा शाश्‍वत मार्ग म्हणून मी पॉली हाऊस काढण्याचे ठरविले. त्यासाठी के.डी.सी.सी बँकेतून कर्ज काढले.  चार महिन्यापासून माझी फुलबाग सुरू झाली. कोरोना व्हायरस मुळे सर्वत्र बंद आहे . गेल्या दहा बारा दिवसांपासून मात्र फुले अक्षरशा उकीरंड्यावर टाकावी लागत आहेत. कर्जाचे हप्ते कसे भरायचे हा प्रश्न माझ्यासमोर आहे. शासनाने काहीतरी मदत करावी. 
 - पंढरीनाथ मोरे
 जरबेरा फुल शेती उत्पादक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Algebra agriculture has been plagued by the Corono virus