पवारांभोवती सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे मोहोळ; आटपाडी दौऱ्यातील चित्र

नागेश गायकवाड
Sunday, 15 November 2020

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रदिर्घकाळानंतरच्या आटपाडी दौऱ्यात त्यांच्यासोबत दिर्घकाळ केलेल्या आणि आता वेगवेगळ्या पक्षात विखुरलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा वावर राहिला.

आटपाडी (जि. सांगली) : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रदिर्घकाळानंतरच्या आटपाडी दौऱ्यात त्यांच्यासोबत दिर्घकाळ केलेल्या आणि आता वेगवेगळ्या पक्षात विखुरलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा वावर राहिला. आटपाडी तालुक्‍यात पवार आणि देशमुख यांच्यातील स्नेहसंबधाला पक्षाच्या भिंती अडसर ठरू शकत नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. यावेळी त्यांच्याभोवतीचे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे मोहोळ प्रकर्षाने जाणवत होते. 

पवार यांचा हा दौरा खरे तर खांजोडवाडीतील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर होता. पवार यांनीही राजकीयदृष्ट्या या दौऱ्याची फारसी चर्चा होणार नाही अशी दक्षता घेतली होती. सुमारे चाळीस पंचेचाळीस वर्षापासूनच्या त्यांच्या देशमुखांसोबतच्या स्नेहसंबंधाला त्यांनी यानिमित्ताने नव्याने उजाळा दिला. या दौऱ्याच्या नियोजनात अमरसिंह देशमुख यांचा सक्रीय सहभाग होता.

या दौऱ्यात पवार यांच्यासोबत दिर्घकाळ राजकीय प्रवास केलेले शिवसेनेचे आमदार अनिल बाबर देखील उपस्थित होते. आमदार सुमन पाटील, पदवीधरचे उमेदवार अरुण लाड, माजी आमदार सदाशिवराव पाटील, दीपक साळुंखे, आनंदराव पाटील आणि भाजपवासी झालेले सर्व देशमुख मंडळीही होते. पवार यांचे हेलिकॅप्टर देशमुख यांच्या शिक्षण संस्थेच्या मैदानावर उतरले. अमरसिंह यांनी तेथे स्वागत केले. यानंतर एकत्रित भिंगेवाडी, आटपाडी, खानजोडवाडी ते आटपाडी असा त्यांनी प्रवास केला. 

श्री पवार यांनीही भाषणात चाळीस वर्षांपूर्वी श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्यासोबत या भागातील फिरस्तीच्या आठवणींना उजाळा दिला. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला होता. या साऱ्या घडामोडी मागे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते. अलीकडेच जयंत पाटील आटपाडीला आल्यावर अमरसिंह देशमुख यांच्या बाबासाहेब देशमुख बॅंकेला भेट देऊन चर्चा केली होती. शरद पवार यांच्या दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी त्यांनीच अमरसिंह देशमुख यांच्याकडे सोपवली होती. 

पवार यांच्या दौऱ्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ यापुढेही काढले जातील. ती संधी त्यांनी या दौऱ्यात कोणतेही राजकीय भाष्य टाळून सर्वांना दिली आहे. गेल्या काही दिवसात तालुक्‍यात राष्ट्रवादीची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी आटपाडीवर विशेष लक्ष दिले आहे. पवार यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादी अंतर्गत घडामोडी कशा गतीमान होतात याकडे आता सर्वांचे लक्ष असेल. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All-party activists around Pawar; Picture of Atpadi tour