कुरुंदवाड पाणी योजना नगराध्यक्षांनी बंद पाडल्याचा आरोप

अनिल केरीपाळे
Tuesday, 10 November 2020

आम्ही पालिकेत सत्तेत असताना पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरवात केली मात्र ही योजना बंद पाडण्याचे पाप नगराध्यक्ष जयराम पाटील आणि त्यांच्या पुत्राने केल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष, भाजप नेते रामचंद्र डांगे यांनी आज केला.

कुरुंदवाड : आम्ही पालिकेत सत्तेत असताना पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरवात केली मात्र ही योजना बंद पाडण्याचे पाप नगराध्यक्ष जयराम पाटील आणि त्यांच्या पुत्राने केल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष, भाजप नेते रामचंद्र डांगे यांनी आज केला. शिवाय शहराच्या विकासासाठी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे निधी मागणी केली असून तत्काळ पाच कोटींचा निधी त्यांच्याकडून मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही नगरसेवक माझ्यासोबत असून पालिकेत लवकरच वेगळे चित्र दिसेल गौफ्यस्फोटही डांगे यांनी केला. 
नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या चिरंजीवाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे शहराच्या विकासाचे तीन तेरा वाजले आहेत असे म्हणत डांगे यांनी विजय पाटील यांच्यावर टीका केली. पालिका ही शहराची आहे. शहराच्या विकासासाठी आम्ही सहकार्याचा हात पुढे केला मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

नगराध्यक्ष जयराम पाटील ठाम भूमिका व निर्णय घेत नाहीत. त्यांचे सर्व निर्णय त्यांचे चिरंजीव घेत आहेत त्यामुळे सत्तारुढ आघाडीचे अनेक नगरसेवक नाराज आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही नगरसेवक माझ्यासोबत आहे. शहराच्या पाणी पुरवठ्याच्या ठेकेदाराकडून त्यांनी मलिदा मागितला. त्याला त्रास देण्याचे काम केले. मागणी पूर्ण न केल्याने त्याचा ठेका रद्द केला. त्यामुळे काही नगरसेवक अडचणीत आले आहेत. ही योजना पूर्ण करण्यासाठी त्या ठेकेदारासोबत चर्चा करून नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे डांगे यांनी सांगितले. 

शहर विकासाबाबत यड्रावकरांशी चर्चा 
शहराच्या विकास कामासाठी पाच कोटींच्या निधीबाबत आरोग्य राज्यमंत्री डॉ. यड्रावकर यांच्याशी चर्चा झाली आहे. लवकरच निधी मिळणार असून विकासकामांना सुरवात करणार आहे. मार्चपर्यंत आणखीन पंधरा कोटींचा निधी देण्याचे आश्वासन मंत्री यड्रावकरांनी दिले आहे. नगराध्यक्षांच्या पुत्राने उपनगराध्यक्ष बदलणे आणि स्वीकृत नगरसेवक बदलण्या पलीकडे काहीच केले नाही. त्यामुळे चार वर्षात शहराचा विकास होऊ शकला नाही, असा आरोपही रामचंद्र डांगे यांनी केला. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allegation That The Mayor Closed The Kurundwad Water Project Kolhapur Marathi News