आंबेओहळ प्रकल्पाचा प्रश्न पेटला: धरणग्रस्तांतून उद्रेक

Ambeohol project affected Authorities report to police
Ambeohol project affected Authorities report to police

उत्तूर (कोल्हापूर) : समंजसपणा दाखवूनदेखील अधिकाऱ्यांनी धरणाचे काम सुरू केल्याने संतप्त दोघा धरणग्रस्तांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. इतर धरणग्रस्तांनी काडीपेटी व कॅन काढून घेतल्याने अनर्थ टळला. आंबेओहळ प्रकल्पाचा प्रश्‍न पेटला असून धरणग्रस्तांतून उद्रेक झाला. दरम्यान, प्रकल्पग्रस्तांनी अंगावर रॉकेल ओतून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता दिनेश खट्टे यांनी पोलिसांत दिली.
 

आज दुपारी बारा वाजता धरणावर टेहळणीसाठी काही धरणग्रस्त गेले होते. त्यांना धरणाचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे धरणग्रस्त संतप्त झाले. सचिन पावले, सुरेश पावले, शिवाजी गुरव, शामराव पुंडपळ, दिनकर पावले, जानू पावले, राजू पावले यांच्यासह धरणग्रस्त प्रकल्पस्थळावर जमा झाले. त्यांनी काम सुरू केल्याबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारला. यातून वाद झाल्याने तणाव वाढला. दरम्यान, सचिन पावले, सुरेश पावले यांनी अंगावर रॉकेलचे कॅन ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवाजी गुरव व अन्य धरणग्रस्तांनी त्यांच्या हातातील काडीपेटीचा बॉक्‍स काढून घेतला. दरम्यान, प्रकल्पस्थळावर उपविभागीय अभियंता दिनेश विठ्ठल खट्टे यांनी आपल्याला पेटवण्याचा प्रयत्न झाल्याबाबत दहा जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.


तक्रारीत म्हटले आहे, प्रकल्पाचे काम करताना सचिन विष्णू पावले, शिवाजी धोंडिबा गुरव, गणपत केरबा पावले, दिनकर बाळू पावले, शामराव दशरथ पुंडपळ, कल्पक पावले, सुरेश रामचंद्र पावले, राजू गोविंद पावले (आरदाळ, ता. आजरा) तेथे आले. या वेळी मला रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. सोबत असलेले रमेश परीट यांचा मोबाईल काढून घेतला. शासकीय कामात अडथळा आणला. या तक्रारीवरून उत्तूर पोलिस दूरक्षेत्रात गुन्हा नोंद झाला आहे.
कार्यकारी अभियंता स्मिता माने, तहसीलदार विकास आहीर, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे उपस्थित होते.

उद्या प्रांत समोर धरणे आंदोलन
माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी उत्तूर पोलिस दूरक्षेत्रामध्ये प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली. ते म्हणाले, ‘‘ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबर बैठक घेऊन चर्चा करणेचे ठरले होते; मात्र पाटबंधारे खात्याने काम सुरू केले. हा आतताईपणा बरोबर नाही. बुधवारी  (ता. ९) गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे.’’  बाळेश नाईक, सदानंद व्हनबट्टे, संतोष बेलवाडे, राजू देशपांडे, महादेव खाडे उपस्थित होते.

धरणग्रस्तांनी केलेले कृत्य धक्कादायक आहे. यावर्षी घळभरणी करण्याचे नियोजन आहे. घळभरणीसाठी अवधी कमी आहे, यामुळे काम सुरू राहणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांच्या अंगावर रॉकेल ओतल्यावर त्यांना मानसिक धक्का बसला.
- महेश सुर्वे, अधीक्षक अभियंता

दुपारी बाराच्या दरम्यान प्रकल्पस्थळावर गेलो. काम बंद करण्याची विनंती केली, मात्र आडवे आला, तर चिरडून मारू अशी भाषा अधिकाऱ्यांनी वापरली. त्यामुळे काही धरणग्रस्तांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी रॉकेलचा कॅन काढून घेताना झटापटीत काही अधिकाऱ्यांच्या अंगावर रॉकेल पडले. अधिकाऱ्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला.
- शिवाजी गुरव, धरणग्रस्त संघटनेचे नेते

संपादन- अर्चना बनगे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com