आणि कोल्हापुरात अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उजळून निघाले

सुयोग घाटगे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या निधीतून या स्मारकाच्या सुशोभीकरणास निधी मंजूर करण्यात आला होता. या सुशोभीकरणानंतर हे स्मारक आणि परिसर विद्युत रोषणाईने उजळून गेला आहे. 

कोल्हापूर : लोककलेला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष असून, त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राजारामपुरी येथील स्मारकास कायमस्वरूपी विद्युत रोषणाईचे काम पूर्ण करण्यात आले. 
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या निधीतून या स्मारकाच्या सुशोभीकरणास निधी मंजूर करण्यात आला होता. या सुशोभीकरणानंतर हे स्मारक आणि परिसर विद्युत रोषणाईने उजळून गेला आहे. 
या वेळी बोलताना श्री. क्षीरसागर म्हणाले, ""लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे साहित्य क्षेत्रातील एक विद्यापीठ आहेत. विद्यापीठ जसे सर्व शाखांचे असते तसेच वाङ्‌मयातल्या सर्वच प्रकारात अण्णा भाऊ साठे यांनी आपले नाव कोरून ठेवले आहे. दलित आणि मातंग समाजासह सर्वच जातीधर्मांच्या लोकांसाठी अण्णा भाऊ साठे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या साहित्य वाचनातून अनेक लेखकांना लेखनाची योग्य दिशा मिळाल्याचे आज अनेक मान्यवर लेखक मान्य करतात. एकाच व्यक्तीची विविधांगी कामगिरी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-विदेशातही शोधून सापडणार नाही. अशा थोर वाङ्‌मयकर्त्या आदर्श कलावंताला जन्मशताब्दीनिमित्त विनम्र आदरांजली वाहिली.'' 

अण्णा भाऊंच्या कथा 
अन्‌ छक्कडींचा रंगणार आविष्कार 

 लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उद्या (शनिवारी) "आठवण लोकशाहिराची' हा अभिनव ऑनलाईन प्रयोग रंगणार आहे. त्यातून अण्णा भाऊंच्या विविध साहित्यासह कथा आणि छक्कडींचाही आविष्कार अनुभवता येणार आहे. येथील प्रत्यय नाट्य संस्थेच्या "साक्षात' या उपक्रमाचा प्रारंभ या कार्यक्रमाने होणार आहे. "फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून हा आविष्कार अनुभवायला मिळणार आहे. 
अण्णा भाऊ साठे ऊर्फ तुकाराम भाऊराव साठे. शाळेचं तोंड बघून परत फिरलेल्या, वयाच्या अकराव्या वर्षी सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावातून पोटासाठी मुंबईला गेलेल्या या शाहिराने पुढे जाऊन विद्रोही साहित्याची परंपरा जपली, वाढवली. एकोणपन्नास वर्षात त्यांनी अनेक कादंबऱ्या, पोवाडे, गीते, लावण्या, छक्कडी, नाटके एव्हडेच नाही तर मराठी सिनेमांसाठीच्या कथा लिहिल्या आणि चित्रपटात कामे देखील केली. 
संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लढ्यात सहभागी होऊन, शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर गव्हाणकर यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा तालबद्ध केला. त्यांच्या एकूणच साहित्याचा प्रवास उलगडत "आठवण लोकशाहिराची' हा कार्यक्रम रंगणार आहे. शाहिर रणजित कांबळे यांच्यासह रसिया पडळकर, आदित्य खेबुडकर आणि विकास पाटील यांचे सादरीकरण असेल. सायंकाळी सात ते आठ या वेळेत हा कार्यक्रम होईल.

संपादन - यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: And in Kolhapur, the monument of Anna Bhau Sathe was lit.