
कोल्हापूर : रस्त्यावर उभे राहिलेले कुत्रे आपल्याकडे एकटक पाहू लागले, की भलेभलेही टरकतात. कुत्र्याचा काय नेम सांगता येत नाही बाबा, म्हणून कुत्र्यासमोरून लांब जातात. पण, कोल्हापुरात एक बाळासाहेब आहेत. त्यांचे वेगळेपण असे की शहरातील कुत्री या बाळासाहेबांना घाबरतात. बाळासाहेबांचा सहज बोलण्याचा आवाज जरी कानावर पडला तरी कुत्री चटकन दिशा बदलतात. त्याला कारणही तसेच आहे. हे बाळासाहेब कुत्री पकडतात. महापालिकेत ते कामगार आहेत. कुत्री पकडणे हेच त्यांचे काम आहे. गेली 36 वर्षे ते हेच काम करीत आहेत. पण, कोरोनामुळे बाळासाहेबांचे दिवस बदलले आहेत. आता रात्री रस्त्यावर माणसे कमी आणि कुत्री जास्त झाली आहेत. बंद वातावरणामुळे त्यांचे खाणे-पिणे कमी झाले आहे. कुत्री चवताळली आहेत. कुत्री पकडायच्या गाडीचा आवाज ऐकला तरी गल्ली, बोळ, सांदरीत पळ काढणारी कुत्री आता आक्रमक होऊन त्या गाडीवरच भुंकत आहेत. त्यांचे कळप वाढले आहेत. परिणाम असा झाला आहे, की बाळासाहेब आता कुत्र्यांना घाबरू लागले आहेत. आणि काही दिवस झाले खबरदारी म्हणून त्यांनी रात्री कुत्री पकडायचे थांबविले आहे. 36 वर्षांत पहिल्यांदा काही दिवसांसाठी अशी वेळ आली आहे.
बाळासाहेब गणाचारी या महापालिकेच्या एका अवलिया कामगाराची ही कोरोना लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर बदललेल्या लाईफस्टाईलची कथा आहे. बाळासाहेब महापालिकेत आरोग्य कर्मचारी म्हणून 36 वर्षांपूर्वी नोकरीत लागले. आणि धाडसी स्वभावामुळे त्यांच्याकडे भटकी कुत्री पकडण्याचे काम देण्यात आले. एक लाल रंगाची जीप यासाठी दिली. रात्री ही घेऊन बाळासाहेब व अन्य दोन सहायक कर्मचारी बाहेर पडत. कुत्र्याच्या अंगावर पोते टाकून किंवा चपळतेने कुत्र्याचा मागचा पाय पकडून त्यास जीपमध्ये टाकत. पूर्वी अशी पकडलेली भटकी कुत्री गावाबाहेर कोठे तरी सोडली जायची.
अलीकडच्या काळात पकडलेल्या कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली जाते. कुत्रे पकडले की ते आयसोलेशन हॉस्पिटलमधील एका स्वतंत्र खोलीत आणले जाते. त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाते. या कामासाठी बाळासाहेबांचा साऱ्या कोल्हापुरात वावर. कुत्र्यांचे घ्राणेंद्रीय तीक्ष्ण असते. किंबहुना कुत्रे त्याच्या संपर्कात आलेल्याला ओळखते. आणि त्यात बाळासाहेब रोज आपल्याला पकडण्यासाठी मागे लागतात. दबा धरून बसतात, हे कुत्र्यांना माहिती झालेले. त्यामुळे लाल रंगाची जीप आणि त्यात बाळासाहेब पाहिले की कुत्री दचकायचीच.
आता मात्र भटक्या कुत्र्यांना खायला-प्यायला पुरेसे नसल्याने ती आक्रमक झाली आहेत. रस्त्यावर कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी आहेत. त्यामुळे लोकांत भीतीचे वातावरण आहे. याचा अनुभव बाळासाहेब आणि त्यांच्या कुत्री पकडणाऱ्या पथकालाही येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून तूर्त कुत्रे पकडणे बंद झाले आहे.
कुत्रे पकडणे नोकरीचा भाग. त्यामुळे हे काम मी 36 वर्षे करीत आहे. कुत्र्याची भीती मोडली आहे. पण, आता कुत्री आक्रमक झाली आहेत. अंगावर धावून येतात. मी आता त्यांना पकडत नाही. उलट कुत्र्यांना खायला घालतो. पण, कुत्री घाबरत नाहीत. त्यामुळे काही दिवस रिस्क नको म्हणून काम थांबविले आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुन्हा काम सुरू होईल.
- बाळासाहेब गणाचारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.