शिक्षणाच्या नगरीत अंगणवाड्या अडगळीत

ओंकार धर्माधिकारी  
मंगळवार, 26 मे 2020

राजर्षी शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. त्याच शिक्षणाच्या नगरीत अंगणवाड्या मात्र अडगळीत गेल्या आहेत. मंडळाची खोली, एखाद्या घराची पडवी, जिन्या खालची जागा इथे अंगणवाडी भरते. शासनाकडून पैसे न आल्याने 750 रुपये भाड्यात अंगणवाडी सेविका प्रसंगी पदरचे पैसे भरून हा बालविकास प्रकल्प चालवतात. अपुरी जागा, जागा मालकाचा जाच आणि आर्थिक ओढाताण करत या अंगणवाड्या कशाबशा सुरू आहेत. 

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. त्याच शिक्षणाच्या नगरीत अंगणवाड्या मात्र अडगळीत गेल्या आहेत. मंडळाची खोली, एखाद्या घराची पडवी, जिन्या खालची जागा इथे अंगणवाडी भरते. शासनाकडून पैसे न आल्याने 750 रुपये भाड्यात अंगणवाडी सेविका प्रसंगी पदरचे पैसे भरून हा बालविकास प्रकल्प चालवतात. अपुरी जागा, जागा मालकाचा जाच आणि आर्थिक ओढाताण करत या अंगणवाड्या कशाबशा सुरू आहेत. 

एकात्मिक बालविकास सेवा योजना (शहरी प्रकल्प) याअंतर्गत महापालिका क्षेत्रातील अंगणवाड्या चालवल्या जातात. शहरात सुमारे 210 अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांना जो निधी मिळतो, त्यात केंद्रसरकार 60 टक्के आणि राज्यसरकारचा 40 टक्के वाटा आहे. शहरीभागात अंगणवाडी चालवण्यासाठी भाड्याने जागा घेतली जाते. यासाठी महिना 6 हजार रुपयांची तरतूद आहे. पूर्वी ते 750 रुपये होते. त्यानुसार या भाड्यात जेथे जागा मिळतील तेथे या अंगणवाड्या चालवल्या जातात. शासनाने भाड्यात वाढ केली, पण अद्याप ते पैसे दिले नाहीत. त्यामुळे कमी भाड्यात मिळालेल्या पूर्वीच्या जागेतच या अंगणवाड्या सुरू आहेत. शहरातील बहुतांशी अंगणवाड्या घराच्या पडवीत, मंडळाच्या खोलीत किंवा एखद्या इमारतीच्या जिन्याखाली सुरू आहेत. झोपडपट्टी भागात तर एखाद्या कोंदट झोपडीतच अंगणवाडी भरते. 

वीज, पाणी, पंखा, ट्यूबलाईट या सुविधा असाव्यात, असे शासनाने निर्धारित केले आहे. या जेमतेम साधनांच्या साहाय्याने अंगणवाडी सुरू होते. अंगणवाडी सेविकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शासनाकडून सहा महिन्यांचे पैसे एकदम येतात. तोपर्यंत या सेविकांनाच तुटपूंजा पगारातील 750 रुपये भाडे भरावे लागते. भाड्याच्या खोलीत घरमालकाचे साहित्य असते, तर मंडळाच्या खोलीत गणेशोत्सवाचे साहित्य असते. मुळातच छोटी असणाऱ्या या जागेत अडचणीत या अंगणवाड्या चालतात. 

गंगावेस येथील शाहू तरुण मंडळाच्या खोलीत अंगणवाडी चालते. दरमहा 750 रुपये भाडे आहे. भाडे वाढवावे म्हणून येथील कार्यकर्त्यांनी तगादा लावला होता, मात्र मंगळवारी (ता.12) कार्यकर्त्यांनी येऊन शिवीगाळ केली. अंगणवाडीच्या साहित्याची नासधूस केली. सहा महिने मी स्वतःचे पैसे घालून भाडे भरते. 
- फरिदा मुल्ला, अंगणवाडी सेविका. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anganwadis in the city of education