"आण्णा' भांबावतो, अन झाडंच पाडतो.... 

"आण्णा' भांबावतो, अन झाडंच पाडतो.... 

कोल्हापूर : "आण्णा' व त्याचा "बारक्‍या' जंगलात रुबाबात वावरतात, ऊस, झाडाचा पाला आणि गवतावर ताव मारतात. 
नदीत डुंबतात. सगळं कसं आनंदात सुरू असतं. त्याच्यासोबत मादी असते. अचानक आण्णा भांबावतो, ओरडायला लागतो, आसपासची झाडं पाडतो, मादी पण सैरभैर होते. थोड्यावेळाने दोघे शांत होतात. या घटनेतील आण्णा म्हणजे टस्कर हत्ती, वनपथकाने त्याला आण्णा नाव दिले. पिल्लाच्या आठवणीने आण्णा सैरभैर होतो, असे वन कर्मचाऱ्यांचे निरीक्षण आहे. या हत्ती दांम्पत्याचा दोडामार्ग ते चंदगड हा प्रवास वनविभागाने नोंदवला आहे. पाटणेचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी हत्तीच्या हालचालींची वरील निरीक्षणे नोंदवली आहेत. 
श्री. पाटील सांगतात, दोडामार्गात गतवर्षी एक नर टस्कर, मादी व दोन पिल्लांचा वावर होता. यातील नर पहिल्यांदा जानेवारीत तिल्लारीचा घाट, जंगल तुडवत वर चंदगडच्या पाटणेत आला. महिनाभर जंगलाचा अंदाज घेऊन डोंगर उतरून तो पुन्हा दोडामार्गात खाली गेला. 15 दिवसांत मादी हत्ती व एक पिल्लू घेऊन पुन्हा पाटणे जंगलात आला. त्याचवेळी आणखी एक पिल्लू दोडामार्ग जंगलात राहिले. पाटण्यात हिंडताना टस्कर व मादीला त्या पिल्लाची आठवण होते. तेव्हा दोघेही सैरभैर होऊन जंगलालगतच्या शेतीत घुसतात, दिसेल ते झाड पाडतात. सात महिन्यांत पाटणे, पार्ले, तिल्लारी, तिल्लारी नगर, दोडामार्ग भागात तीन हत्तींचा कळप वावरतो आहे. 
ते म्हणाले, ""त्यांच्यावर लक्ष ठेवणे सोपे व्हावे, यासाठी "न्हानगं कुटुंब' व टस्कर म्हणजे "आण्णा', "बारक्‍या' म्हणजे पिल्लू अशी नावे दिली. काही महिन्यांपूर्वी यातील "आण्णा' दुसऱ्या बारक्‍याला आणण्यासाठी पुन्हा डोंगर उतरून दोडामार्गच्या जंगलात गेला. पण त्याचा बारक्‍या काही त्याच्याबरोबर आला नाही. तो तिथेच रमला. मग पुन्हा आण्णा वर पाटण्याच्या जंगलात आला. आण्णा आणि मादीला जेव्हा दुसऱ्या बारक्‍याची आठवण येते, तेव्हा ते भांबावतात व नुकसान करतात. 
वनपाल बी. आर. भांडकोळी, अमोल शिंदे, वनरक्षक नेताजी धामणकर, चंदकांत बांदेकर, विश्‍वनाथ नार्वेकर, दत्ता बडे, ओंकार जंगम, मोहन तुपारे, अर्जुन पाटील यांचे पथक हत्तीच्या कळपाच्या हालचाली नोंदवत आहे. 
हत्तींच्या हालचालींचे अर्थ लावतो. त्यातून हत्तींचा मार्ग व त्याच्या संभाव्य कृतीचा अंदाज येतो. हत्ती जंगल सोडून बाहेर आल्यास त्यांना तातडीने जंगलात पुन्हा परतविण्यासाठी निरीक्षणे उपयोगी पडतात. वन्यजीव आपलाच सोबती असल्याने त्याचे संरक्षण करणे जबाबदारी आहे.'' 
- दत्ता पाटील, वनक्षेत्रपाल.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com