ऐनापूरमध्ये कोरोना रुग्णांना मिळतो सकस आहारासह मानसिक आधार

अजित माद्याळे
Tuesday, 22 September 2020

सध्या कोरोना बाधित रुग्ण आढळला की त्याने जणू काही मोठे पापच केल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तो रुग्ण आणि संबंधित कुटुंबीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक बनत असतानाच तालुक्‍यातील ऐनापूर गावाने राबवलेला उपक्रम निश्‍चितच इतर गावांना प्रेरणादायी आणि सकारात्मक ठरत आहे.

गडहिंग्लज : सध्या कोरोना बाधित रुग्ण आढळला की त्याने जणू काही मोठे पापच केल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तो रुग्ण आणि संबंधित कुटुंबीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक बनत असतानाच तालुक्‍यातील ऐनापूर गावाने राबवलेला उपक्रम निश्‍चितच इतर गावांना प्रेरणादायी आणि सकारात्मक ठरत आहे.

हा "भयमुक्त ऐनापूर' पॅटर्न विशेष चर्चेत असून ग्राम दक्षता समितीच्या पुढाकाराने प्रत्येक कोरोना रुग्णावर घरीच उपचार केले जात आहेत. सकस आहार आणि मानसिक आधारावर आतापर्यंत तीन रुग्ण दहा दिवसांत ठणठणीत बरे झाले आहेत. 
कोरोना पॉझिटिव्ह लोकांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक बनत आहे. यामुळे संबंधित रुग्णांच्या मानसिक खच्चीकरणात भरच पडत आहे.

एकीकडे हे चित्र असताना ऐनापूर गावाने मात्र "भयमुक्त ऐनापूर'चा नारा दिला. गावात आढळणाऱ्या प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णावर घरीच उपचार करण्याचे ग्राम दक्षता समितीने ठरविले. माजी सरपंच ऍड. दिग्विजय कुराडे, कॉंग्रेसचे पदाधिकारी ऍड. सुरेश कुराडे यांनी दक्षता समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, तरुण कार्यकर्त्यांच्या सहकार्याने भयमुक्त ऐनापूरचा उपक्रम राबवण्यास प्रारंभ झाला. 

ऐनापूरने यापूर्वीच गावात घर टू घर तपासणी करून रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर अशा इतर आजाराच्या तीनशेहून अधिक रुग्णांची यादी तयार केली. या लोकांना कोरोनाची बाधा लवकर होत असल्याने त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले. औषधोपचार वेळीच सुरू करण्याचे आवाहन केले. दरम्यान, गावात तीन कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांना विश्‍वास देऊन घरीच उपचारासाठी परावृत्त केले.

ग्राम दक्षता समितीने प्रशासनाला सांगून या लोकांवर घरीच उपचार सुरू केले. आरोग्य सेविका योगीता गुरव, गीता गवस, ग्रामसेविका सोनाली पाटील यांनी यासाठी परिश्रम घेतले. रुग्णांचा संपूर्ण खर्च ग्रामस्थांनी केला. घरातच उपचार होत असल्याने आहार सकस मिळाला. रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्यांना शेजाऱ्यांनी आसरा दिला. मानसिक आधार, सकस आहार आणि ग्रामस्थांतून मिळणारी सकारात्मक ऊर्जा यामुळे अवघ्या दहा दिवसांत गावातील तीनही रुग्ण कोरोनामुक्त झाले. 

नियमांचे काटेकोर पालन 
गावात सर्व जण कोरोना नियंत्रण नियमांचे काटेकोर पालन करतात. एकीकडे कोरोनाला घाबरून लोक किरकोळ लक्षणे लपवित असतानाच, ऐनापुरातील लोक मात्र गावात भयमुक्त वातावरण असल्याने सर्दी, ताप, खोकल्याचे लक्षणे आढळताच स्वत:हून तपासणीला जात आहेत. उपकेंद्रात पीपीई किट, औषधांचा साठा केला आहे. कोरोना पॉझिटिव्ह लोकांपासून चार हात लांब राहणाऱ्या लोकांना ऐनापूर गावाने मात्र आदर्श घालून दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Annapur Village Corona Patients Get Mental Support Kolhapur Marathi News