जिल्हा परिषद स्थायी समितीत चौकशी समित्यांची घोषणा

सदानंद पाटील
Wednesday, 28 October 2020

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात झालेला मॅट घोटाळा व वित्त विभागातील सक्‍तीची निवृत्ती हा विषय चांगलाच गाजत आहे. सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा झाल्यावर याबाबत चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत पदाधिकाऱ्यांची प्राथमिक चर्चा झाली. गुरुवारी (ता. 29) स्थायी समितीचे आयोजन करण्यात आले असून, यात या दोन्ही समित्यांची घोषणा होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्हा परिषदेत एक वर्षापासून मॅट घोटाळा गाजत आहे. मॅटचे स्पेसिफिकेशन, निवड, त्याची रक्‍कम या सर्वच बाबी वादग्रस्त ठरल्या आहेत. याबाबत "सकाळ'ने आवाज उठवल्यानंतर एक चौकशी समिती नेमली. या समितीनेही "मॅट'च्या दर्जावर बोट ठेवले. हा चौकशी अहवाल आल्यावर कारवाई होणे आवश्‍यक होते. मात्र, कारवाई होण्यापेक्षा हे प्रकरण मिटविण्यासाठीच धडपड झाली. 
दरम्यान, सत्ताबदल झाला. नूतन शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. मात्र, गुन्हा नोंद झाला असला तर इतरांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे सर्व दोषींवर कारवाई करण्यासाठी एक समिती नेमली जाणार आहे. 
वित्त विभागाचा सावळा गोंधळ काही नवीन नाही. जुन्या चुकांसाठी वित्त विभागाने आपल्याच काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास दिला आहे. त्यातून दोघांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मात्र, हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र असल्याची तक्रार या दोन कर्मचाऱ्यांनी केली आहे. यात त्यांनी मुख्य वित्त व लेखाधिकारी संजय राजमाने यांना जबाबदार धरले. श्री. राजमाने अडचणीत येऊ नये म्हणून या दोन कर्मचाऱ्यांचे मन वळविण्यासाठी हस्तक सक्रिय झाले आहेत. ज्यांनी या दोन कर्मचाऱ्यांना अडचणीत आणले, तेच लोक प्रकरण मिटविण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, या प्रकरणाचीही चौकशी होईल. यात अनेक अधिकारी व कर्मचारी अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

संपादन - यशवंत केसरकर
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Announcement of inquiry committees in Zilla Parishad Standing Committee