वेश्‍या व्यवसाय विरोधी दिन : वारांगनांची स्वाभिमानाची अशीही लढाई

नंदिनी नरेवाडी
Monday, 5 October 2020

वेश्‍या व्यवसायातून मुक्त होऊन स्वीकारले दुसरे व्यवसाय  

कोल्हापूर : ‘ति’ची आई रेड लाईट एरियात राहणारी. रात्रीच्या अंधारात काम करून कसेबसे घरखर्च भागवणारी. किशोरवयात तिची गल्लीतीलच एका मुलासोबत मैत्री जमली. काही कारणाने त्यांच्यात खटके उडू लागले. आईप्रमाणेच तोच व्यवसाय करण्याची वेळ परिस्थितीने तिच्यावर आणली, मात्र वारांगना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तिला या व्यवसायापासून परावृत्त केले. पुढे मंगळवार पेठेतील मुलींच्या वसतिगृहात तिला दाखल केले. थांबलेले शिक्षण पुन्हा सुरू झाले. १२ वी झाल्यानंतर तिला पुण्याला नर्सिंगच्या अभ्यासक्रमास पाठविले.

नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर तिला नोकरीही लागली. तेथीलच एका मुलासोबत तिचे लग्नही झाले. दोघांचाही सध्या सुखाचा संसार सुरू आहे. ही घटना आहे, येथील एका वारांगनेच्या मुलीची. अशीच विविध सकारात्मक स्थित्यंतरे आता येथे अनुभवायला मिळत आहेत. वारांगनांची पुढच्या पिढीने आवर्जून शिक्षणावर भर देत विविध क्षेत्रात यशाची भरारी घेतली आहे. 

हेही वाचा- गल्लीत कुत्र मेलं, मृत्यूची शंका आली म्हणून थेट केंद्र सरकारला मेल अन् चौकशीसाठी तीन उपायुक्तांची नेमणूक -
एकूणच वारांगनांच्या परिस्थितीचा विचार केला तर दुर्बल आर्थिक स्थिती, कौटुंबिक पाठबळाचा अभाव, व्यक्तिगत आयुष्यात आलेल्या संकट समस्यातून ग्रासलेल्या मोजक्‍या महिला वेश्‍या व्यवसायात ओढल्या गेल्या. सुरवातीला गरज व नाईलाजातून या व्यवसायात त्यांचा सहभाग नियमित झाला. तिथेच त्यांना खितपत जगण्याची वेळ आली, मात्र यातूनही काहीजणी नवे सुरक्षित आयुष्य जगण्याची वाट शोधत आहेत. अशा महिलांना या व्यवसायातून सुटका करून त्यांना स्वबळावर उभे करण्याचे प्रयत्न वारांगना सखी संघटनेच्या माध्यमातून येथे होत आहे. 

खासगी कंपनीत नोकरी 

असेच एक दुसरे उदाहरण म्हणजे परिस्थितीने ‘ती’ या जटील व्यवसायात आली. रात्रीचा दिवस करून कसेबसे तिचे जगणे सुरू होते. प्रत्येक वेळी या व्यवसायात नरक यातना भोगाव्या लागल्या. तेव्हा तिला जाणीव झाली, की आपण जे भोगतोय ते इतरांच्या वाट्याला येऊ नये, म्हणून तिने वारांगनांचे पुनर्वसन करणाऱ्या संस्थेसाठी काम सुरू केले. 

हेही वाचा-नितीन जांभळे यांच्या ‘०५५५’चा बोलबाला -

काही वर्षे काम केल्यानंतर तिला त्यांचे अधिकार, होणारे शोषण या सर्व गोष्टींचा उलगडा झाला. आपण जर इतरांना या कामापासून परावृत्त करणार असू तर आपणही या व्यवसायात नसले पाहिजे, असा निर्णय घेतला. तिने ‘तो’ परिसर सोडला. एका खासगी कंपनीत नोकरी करू लागली. त्यातून महिन्याचा खर्च भागवता येईल, इतके पैसे सध्या मिळतात. ही स्वकमाई स्वतःचा स्वाभिमान वाढल्याचे समाधान देणारे असल्याचे त्या सांगतात.  

 

वेश्‍या व्यवसायात असणाऱ्या व हे काम सोडू इच्छिणाऱ्या महिलांना आमची संस्था मदत करते. नव्या पिढीतील मुली याला बळी पडू नयेत, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. सध्या काही महिला, मुलींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते. काहींनी भाजी विक्री, धुणी-भांडी ही कामे स्वीकारून या व्यवसायातून स्वतःची सुटका केली आहे. 
- शारदा यादव, अध्यक्षा, वारांगना सखी संघटना

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anti prostitution day special story by nandini narewadi