माझं कोल्हापूर, थुंकीमुक्त कोल्हापूर ; कोल्हापूरने पेरले, राज्यभर उगवले

मतीन शेख
Tuesday, 27 October 2020

रंकाळा टॉवर परिसरात घोषणा; थुंकीमुक्त जनजागृती मोहीम...

कोल्हापूर - सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची सवय कोरोना संसर्गाला पूरक ठरणारी आहे. म्हणून कोल्हापूर थुंकीमुक्त करण्यासाठी शहरात जनजागृती सुरू आहे. थुंकीबहाद्दरांना चाप लावण्यासाठी नागरिक व सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून जनजागृती करीत आहेत. आज सायंकाळी अँटी स्पीट मूव्हमेंटच्या कार्यकर्त्यांनी रंकाळा टॉवर परिसरात जनजागृती मोहीम राबवली.
'थुंकीचंद गो बॅक', 'माझं कोल्हापूर, थुंकीमुक्त कोल्हापूर' अशा घोषणांनी सुरवात करीत कार्यकर्त्यांनी रंकाळा परिसरात जनजागृती केली. नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जनजागृतीपर आकर्षक संदेश फलक, टोप्या घालत कार्यकर्त्यांनी जनजागृती केली.

प्रशासन ठोस भूमिका घेण्याची खात्री...

आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मोहिमेच्या पूर्वसंध्येला चळवळीची माहिती घेऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला, तसेच पुढील काळात पालिका क्षेत्र थुंकीमुक्त होण्यासाठी प्रशासन ठोस भूमिका घेण्याची खात्री दिली. पालिकेच्या सर्व इमारती 'थुंकीमुक्त क्षेत्र' घोषित करून त्याची अंमलबजावणी व्हावी, अशा मागणीचे निवेदन मोहिमेंतर्गत आयुक्त, महापौरांना दिले.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणेविरोधी चळवळ कृती समितीचे अभिजित गुरव, बंडा पेडणेकर, जीवन बोडके, दीपा शिपूरकर, सारिका बकरे, ललिता गांधी, गीता हासूरकर, राहुल राजशेखर, किसन कल्याणकर, राहुल चौधरी, लखन काजी, बाळासाहेब देसाई, रजत शर्मा, अभिनेता जित पोळ, डॉ. देवेंद्र रासकर, विजय धर्माधिकारी, रामेश्वर पत्की, सतीश पोवार, दीपक देवलापूरकर, सागर बकरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

कोल्हापूरने पेरले, राज्यभर उगवले...

सामाजिक स्वच्छता व आरोग्याशी निगडित गंभीर विषयांबाबत नागरिक चळवळीत सहभागी होत आहेत. 'सकाळ'ने शहरातल्या थुंकीच्या प्रश्नावर प्रकाशझोत टाकत या चळवळीला खमके पाठबळ दिल्यावर जनजागृती मोहीम व्यापक झाली. कोल्हापुरातील चळवळीचा आदर्श घेत गडहिंग्लज, सांगली, सातारा तसेच लातूर जिल्ह्यातही थुंकीमुक्त चळवळ उभी राहत आहे.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anti spitting movement at rankala tower kolhapur