कोणीही येतो कचरा टाकतो 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

जुना शिवाजी पुलाच्या डाव्या बाजूला कोणीही यावे आणि कचरा टाकून जावे, अशी स्थिती आहे. येथे बांधकामातील खरमाती, कचरा तिथे टाकला जातो. कचरा, खरमातीमुळे निम्माअधिक रस्ता बुजला आहे. आधीच कचरा, त्यात विक्रेत्यांमुळे येथे ये-जा करताना वाहनधारकांना अडचण निर्माण होते.

कोल्हापूर : जुना शिवाजी पुलाच्या डाव्या बाजूला कोणीही यावे आणि कचरा टाकून जावे, अशी स्थिती आहे. येथे बांधकामातील खरमाती, कचरा तिथे टाकला जातो. कचरा, खरमातीमुळे निम्माअधिक रस्ता बुजला आहे. शिवाय या कचऱ्याशेजारीच अनेक विक्रेते वस्तूंची विक्री करत असतात. आधीच कचरा, त्यात विक्रेत्यांमुळे येथे ये-जा करताना वाहनधारकांना अडचण निर्माण होते. महापालिकेला हा कचरा दिसत असूनही तो उचलला जात नाही? 

कचऱ्यासह बांधकामातील खरमाती, विटांचे तुकडे, दगड, फुटलेल्या स्टाईल, संडासची फुटकी भांडी, प्लास्टिक, अन्य वस्तू आणून टाकल्या जातात. हा कचरा निम्म्या रस्त्यावर आला आहे. अन्य कचरा बाजूच्या उसाच्या शेतीत पसरला आहे. काही महिन्यांपूर्वी एका संस्थेने नवीन अन्‌ जुना शिवाजी पूल येथे स्वच्छता मोहीम राबविली होती; मात्र पुन्हा इथे कचरा आणून टाकला जात आहे. कितीतरी वर्षे झाली मातीचे ढीग पडून आहेत. नवी पूल तयार केल्यानंतर जुन्या पुलाशेजारील रस्त्याशेजारी असलेली ही माती बाजूला करणे गरजेचे होते; मात्र ही माती आहे. त्या मातीवर गवत, झाडे उगविली आहेत. पाऊस सुरू होईल. महापूर येईल, त्यावेळी हा कचरा अन्यत्र पसरणार आहे. 

विक्रेत्यांमुळे गर्दीत वाढ 
कोल्हापूरपासून पन्हाळा, शाहूवाडी, तळकोकणात जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. शिवाजी पूल ते आंबेवाडीपर्यंत तर हा रस्ता सतत वर्दळीचा असतो. जुना पूल बंद करून नवीन पूल तयार केला; मात्र पुढे रस्ता रुंदीकरण न झाल्याने रस्त्याकडेने चालता येत नाही, बाजूला रस्त्याच्या पट्टीवर कचरा, विक्रेते तर दुसऱ्या बाजूला चिंचेची झाडे, उसाची शेती. ट्रक, टेम्पो, मोठी वाहने जातात तेव्हा विशेषत: सकाळी अन्‌ संध्याकाळी गर्दीत वाढ होते. विक्रेत्यांमुळे खरेदी करणारे वाहने कशीही लावतात. जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा ही खरमाती रस्त्यावर येते. खरमातीवरून वाहने चालविणे हे धोकादायक ठरते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anyone who comes throws garbage