शेतकरी कुटुंबातील मुलगा बनला कुलगुरू

 आनंद शिंदे
Thursday, 1 October 2020

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रा. डाॅ. कलगौडा गु़डसी यांचे प्राथमिक कुरणी, माध्यमिक व बारावीपर्यंतचे शिक्षण बेळगावमधील रूद्राक्षी मठाच्या शाळेत झाले.

संकेश्वर - हुक्केरी तालुक्यातील कुरणी गावचे सुपुत्र प्रा. डाॅ. कलगौडा बसगौडा गुडसी यांची धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झाली आहे. शेतकरी कुटुंबातील मुलाने कुलगुरू पदापर्यंत भरारी घेतल्याने हुक्केरी तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रा. डाॅ. कलगौडा गु़डसी यांचे प्राथमिक कुरणी, माध्यमिक व बारावीपर्यंतचे शिक्षण बेळगावमधील रूद्राक्षी मठाच्या शाळेत झाले. संकेश्वर येथील श्री दुरदुंडेश्वर विद्या संवर्धक संघाच्या महाविद्यालयातून रसायन शास्त्रातून पदवी व धारवाडमधील कर्नाटक विद्यापीठातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण घेतले. तेथेच एम. फिल व पीएच. डी. पदवी संपादन केली. विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी शिक्षण व संशोधन क्षेत्रात भरीव योगदान दिले. 

वडील बसगौडा गुडसी हे शिक्षक असल्याने घरात शैक्षणिक वातावरण होते. त्यांचे एक भाऊ नागेंद्र गुडसी हे शिक्षक म्हणून सेवा बजावत असून दुसरे भाऊ श्रीकांत शेतकरी आहेत. प्रा. डाॅ. कलगौडा गुडसी यांना कुलगुरूपद मिळाल्याने घरासह गावातून समाधान व्यक्त होत आहे. त्यांनी शनिवारी (ता. २६) पदभार स्वीकारला आहे. लवकरच त्यांचे संकेश्वर व जन्मगाव कुरणी येथे स्वागत होणार आहे.

हुक्केरी तालुक्यात आनंदाचे वातावरण

कर्नाटक विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी राज्यभरातून अनेक जण इच्छुक होते. मात्र अनुभव, शैक्षणिक कार्य पाहून राज्यपालांनी अखेर प्रा. डाॅ. कलगौडा गुडसी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. शिक्षण क्षेत्रात मानाचे समजले जाणारे कुलगुरुपद हुक्केरी तालुक्यातील सुपुत्राला मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे. 

हे पण वाचाजगात भारी कोल्हापुरी ; मास्क नाही, प्रवेश नाही, ; मुंबईत झळकला कोल्हापूर पॅर्टन

 

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत घरात उच्च शिक्षणाची परंपरा नसतानाही वडिलांच्या आग्रहास्तव शिक्षणात उतरलो. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य व जिद्द, चिकाटीच्या बळावर आज या पदापर्यंत पोहचलो. या पदाचा वापर परिसरातील सामान्य विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी करणार आहोत.`

-प्रा. डाॅ. कलगौडा गुडसी

 संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of Kalgauda Basgauda Goodsi as the Vice Chancellor of Karnataka University Dharwad