esakal | गडहिंग्लजला गोल्डन सिताफळांची आवक
sakal

बोलून बातमी शोधा

Arrival Of Golden Custard Apple At Gadhinglaj Kolhapur Marathi News

आवक घटल्याने कांदा, बटाट्याच्या दराने पुन्हा उसळी घेतली. गेल्या पंधरवड्यात उतरलेले दर किलोमागे दहा रुपयांनी वाढले. फळभाज्यांचे तेजीत असणारे दर उतरले आहेत.

गडहिंग्लजला गोल्डन सिताफळांची आवक

sakal_logo
By
दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : आवक घटल्याने कांदा, बटाट्याच्या दराने पुन्हा उसळी घेतली. गेल्या पंधरवड्यात उतरलेले दर किलोमागे दहा रुपयांनी वाढले. फळभाज्यांचे तेजीत असणारे दर उतरले आहेत. फळबाजारात गोल्डन सिताफळांची आवक वाढली आहे. जनावरांच्या बाजारात म्हशींची उलाढाल वाढली आहे.

दोन महिन्यापूर्वी कांद्याच्या दराने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते. तब्बल 100 रुपयापर्यंत किलोचा दर पोचला. दिवाळीत हा दर कमी झाला होता. आता पुन्हा आवक घटल्याने कांद्याच्या दराने उसळी घेतली. क्विंटलमागे एक हजार रुपयांनी दरवाढ झाली आहे. 3500 ते 6500 रुपये क्विंटल असा भाव आहे. किरकोळ बाजारात 60 ते 80 रुपये असा किलोचा दर आहे. बटाट्याच्या दरातही क्विंटलमागे 400 रुपयांनी वाढ झाली आहे. 4000 ते 4400 रुपये क्विंटल, तर 50 ते 60 रुपये किलो असा भाव आहे.

लसणाचे भाव स्थिर 70 ते 120 रुपये किलो असा आहे. 
भाजी मंडईत स्थानिक फळभाज्यांची आवक वाढू लागली आहे. गेल्या दीड महिन्यापासून आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे फळभाज्यांचे दर कडाडले होते. दहा किलोचा दर सरासरी 600 रुपये, तर किलोचा दर 80 रुपयांवर पोचला होता. सरासरी दहा ते वीस टक्‍क्‍यांनी दर उतरले आहेत. लावणीतील फळभाज्या विक्रीस आल्यामुळे दर अजून खाली येण्याची शक्‍यता विक्रेत्यांनी व्यक्त केली. दहा किलोचे दर असे- कोबी 200, टोमॅटो 250, मिरची 500, ढबू व दोडका 400, फ्लावर 200, पेप्सी काकडी 150, कोल्हापुरी काकडी 500, वांगी 450 रुपये. 

फळबाजारात सफरचंद, डाळिंबाची आवक कायम आहे. पंढरपूर परिसरातून गोल्डन सिताफळांची आवक वाढली आहे. मोठ्या आकाराच्या या सिताफळाला गर अधिक असून बियांचे प्रमाण कमी असल्याचे फळ विक्रेते संतोष पोवार यांनी सांगितले. किलोचा 120 रुपये असा दर असून आकार मोठा असल्याने किलोला दोन ते तीन फळे येतात. जनावरांच्या बाजारात म्हशींची आवक वाढली आहे. 25 ते 70 हजारापर्यंत म्हशींचे दर आहेत. शेळ्यामेंढ्याची तीन ते दहा हजारापर्यंत दर आहेत. 

सोयाबीनची आवक जेमतेम 
गेल्या पंधरा दिवसापासून सोयाबीनचा दर चार हजाराहून अधिक आहे. या आठवड्यात 4300 रुपये क्विंटल असा दर असल्याचे व्यापारी विजय मोरे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना अजूनही दर वाढण्याची अपेक्षा असल्याने आवक जेमतेम आहे. भुईमूगाची आवकही सुरु झाली आहे. साडेचार ते पाच हजार रुपये क्विंटलचा दर असून स्थानिक भुईमूगाचा पावसामुळे दर्जा कमी असल्याचेही मोरे यांनी सांगितले. 

संपादन - सचिन चराटी