esakal | गडहिंग्लजच्या "त्या' 56 जणांवर लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

Attention To 56 Quarantine People In Gadhinglaj Kolhapur Marathi News

विविध आजारांनी ग्रासलेले आणि सध्या तालुक्‍यातील गावागावांत क्वारंटाईन केंद्रात असलेल्या 56 लोकांवर आरोग्य विभागातर्फे आता विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा, कर्करोग या आजाराच्या नागरिकांना सीपीआर रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी प्रशासनाने दक्षता समितीला आवाहन करून संबंधित नागरिकांच्या कुटुंबीयांचे प्रबोधन करण्यास सांगितले आहे.

गडहिंग्लजच्या "त्या' 56 जणांवर लक्ष

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : विविध आजारांनी ग्रासलेले आणि सध्या तालुक्‍यातील गावागावांत क्वारंटाईन केंद्रात असलेल्या 56 लोकांवर आरोग्य विभागातर्फे आता विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा, कर्करोग या आजाराच्या नागरिकांना सीपीआर रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी प्रशासनाने दक्षता समितीला आवाहन करून संबंधित नागरिकांच्या कुटुंबीयांचे प्रबोधन करण्यास सांगितले आहे.

इतर आजाराच्या नागरिकांना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, चन्नेकुप्पी व यमेहट्टी (ता. गडहिंग्लज) दोन नागरिक क्वारंटाईन कक्षात होते. त्यांचा आधी मृत्यू झाला आणि नंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, या दोन्ही व्यक्तींना कोरोनाचे एकही लक्षण नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. एकाला रक्तदाब आणि दुसऱ्याला मणक्‍याच्या आजाराने ग्रासले होते. या दोन्ही मृत्यूने संबंधित गावातील नागरिक, दक्षता समितीसह प्रशासनालाही धक्का बसला आहे. 

या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने तालुक्‍यातील सर्व गावांमध्ये असलेल्या क्वारंटाईन केंद्रात इतर आजाराच्या रुग्णांची यादी काढण्याची सूचना दक्षता समितीला देण्यात आली. त्यानुसार तालुक्‍यात असे 56 नागरिकांचा अढळ झाला आहे. त्यांना काही ना काही तरी आजार आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा, कर्करोग या आजारांचा त्यात समावेश आहे.

अशा नागरिकांना "सीपीआर'मध्ये चांगल्या उपचारांखाली त्यांना ठेवून त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु, यातील काही आजारी नागरिकांचे कुटुंबीय त्याला विरोध करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने त्यांच्या प्रबोधनाची जबाबदारी दक्षता समितीवर टाकली आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित कुटुंबीयांशी चर्चा करून आजारी नागरिकाला "सीपीआर'मध्ये उपचारांसाठी पाठविण्यास संमती घेण्यास सांगितले आहे. तोपर्यंत सध्या अशा लोकांवर स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे विशेष लक्ष ठेवले जात असल्याचेही चित्र आहे. 

...तर जोखीमचे रुग्ण "सीपीआर'ला 
काही आजारी नागरिकांचे कुटुंबीय त्यांना "सीपीआर'मध्ये उपचारांसाठी नेण्यास नकार देत आहेत. यामुळे 56 मधील अतिशय जोखमीचे असतील त्या नागरिकांना "सीपीआर'मध्ये उपचारांसाठी नेण्याचा प्रयत्न आहे. इतर नागरिकांवर मात्र स्थानिक सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या आजारावर उपचार सुरू करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी शरद मगर यांनी सांगितले.