
कोल्हापूर : कोल्हापुरातून पळालेला तो कोरोनाग्रस्त रुग्णाला इचलकरंजीत रिक्षातून उतरला. काही वेळात शेजारी गोळा झाले. ते मला म्हणाले, "याला कशाला घेऊन आलात. त्याला तर कोरोना झाला आहे.'' ही वाक्ये कानी पडताच माझ्या पायाखालची वाळू सरकली. मी तातडीने धाव घेत तो पळून जाऊ नये, यासाठी त्याच्या घराच्या दरवाजालाच कडी घातली. तातडीने पोलिस तसेच आरोग्य यंत्रणा दाखल झाली. त्याला ते घेऊन गेले आणि माझा जीव भांड्यात पडला. हा थरारक अनुभव सांगितला आहे, रिक्षाचालकाने
सीपीआरमधून बुधवारी कोरोनाबाधिताने कोल्हापूर ते इचलकरंजी असा प्रवास केला. ज्या रिक्षातून कोरोनाग्रस्ताने प्रवास केला त्या रिक्षा चालकाशी `सकाळ' ने संपर्क केला असता त्यांनी नेमकी हकिकत सांगितली. ती अशी : संबंधित रुग्ण सकाळीच सीपीआरमधून बाहेर पडला. तो थेट महाराणा प्रताप चौकात दाखल झाला. इचलकरंजीला नेणार का म्हणून अन्य रिक्षाचालकांना तो हात करत होता. चौकातील बसथांब्यावरही बराच वेळ बसून होता.
दुपारच्या सुमारास मी घरी जेवणाच्या निमित्ताने आलो, रिक्षातील बाजार बाहेर काढत असतानाच रुग्णाने इचलकरंजीला सोडणार का, अशी विचारणा केली. त्याने याच परिसरातील खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्याचे सांगितले. सातशे रुपये भाडे ठरले. वाटेतही माझ्या स्वतःच्या दोन रिक्षा आहेत, असे तो सांगत होता. कोल्हापुरात का ऍडमिट होता, असे विचारले असता अशक्तपणा असल्याने ऍडमिट होतो, असे सांगितले.
इचलकरंजीत बसस्थानकावरच त्याने उतरण्याचा प्रयत्न केला. मी मात्र घरी सोडतो असे सांगितले. तेथे गेल्यानंतर आसपासचे लोक पटापट जमा झाले. मला म्हटले, याला कशाला घेऊन आलात, याला तर कोरोनाची लागण झाली आहे आणि तो कोल्हापुरात ऍडमिट आहे. हे ऐकल्यानंतर क्षणभर मलाही काही सुचेना. माझ्यासह अन्य एकाने त्याच्या घराच्या दरवाजाला बाहेरून कडी घालून घेतली. नंतर पोलिस आणि शासकीय यंत्रणा आली आणि त्यास घेऊन गेली.
मी पुन्हा रिक्षा आहे तशी कोल्हापुरात घेऊन आलो. कोल्हापुरात परतल्यानंतरही कपडे घेऊन सीपीआरला गेलो. कोरोनाग्रस्ताने मला चुकीची माहिती देऊन रिक्षातून प्रवास केला. मात्र, वस्तुस्थिती ध्यानात आली त्या वेळी मलाही घाम फुटला. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये यासाठी सीपीआरमध्ये गेलो.
रिक्षाचालकांची बिकट स्थिती
लॉकडाउनमुळे रिक्षाचालकांची बिकट स्थिती झाली आहे. काही अटी शर्थींवर परवानगी दिली. दोन प्रवाशांवर रिक्षा कशी चालवायची, असा प्रश्न निर्माण झाला. धंदा तर होत नाही, अशा स्थितीत मिळेल ते पॅसेंजर घेऊन जाण्याची वेळ चालकांवर आली आहे. यातूनच या रिक्षाचालकाने थेट कोरोनाग्रस्तालाच इचलकरंजीपर्यंत पोहोचवले.
रमेश पोवार मदतीला
माजी नगरसेवक रमेश पोवार महापालिका यंत्रणेच्या मदतीला धाऊन आले. त्यांनी संबंधित रिक्षाचालकाची समजूत काढली, त्यावेळी रिक्षाचालकाने स्वःतःहून क्वारंटाईन होण्याची तयारी दाखविली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.