एव्हरीबडी से खच्याक, गो कोरोना गो बॅक...!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

कसबा बावड्यातील बाबूराव पाटोळेंचे अस्खलित इंग्रजीतून प्रबोधन... 
 

कोल्हापूर - 'एव्हरीबडी से खच्याक, गो कोरोना गो बॅक...' हा अस्खलित इंग्रजीतील संवाद आता सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला आहे की, हा मस्तमौला माणूस कोण असा सवाल साऱ्यांना पडला आहे. तर हा माणूस आहे कसबा बावड्यातील संकपाळ गल्लीतील. बाबूराव पाटोळे असे त्यांचे नाव. अस्खलित इंग्रजीतून ते सध्या शहर आणि कसबा बावडा परिसरात कोरोनावर प्रबोधन करत असून खबरदारीचा उपाय म्हणून सहा प्रमुख गोष्टींवर भर देण्याचे आवाहन करतात. 

गेल्या दोन दिवसापासून 'कोल्हापूरचा खच्याक मामा' या नावाने सोशल मीडियावरून श्री. पाटोळे यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यांचं शिक्षण विज्ञान शाखेतून झालं आहे आणि साहजिकच इंग्रजीवर त्यांची चांगलीच कमांड आहे. घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली आणि त्यानंतर काही काळ घरोघरी फिरून मार्केटींगचे कामही केले. सध्याही मिळेल ते काम ते करतात आणि गाण्यांच्या माध्यमातून लोकांची करमणूकही करतात. पत्नी, दोन मुली, मुलगा असं त्यांचं कुटुंब. दोन्ही मुली "बीएस्सी' करत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ते शहर परिसरात सकाळी नऊपासून सर्वत्र फिरतात आणि प्रबोधन करतात. सद्यस्थितीबाबत ते सांगतात, "सध्या सर्वत्र फिरतो आणि कोरोनाबाबत इंग्रजी आणि मराठीतून प्रबोधन करतो. मात्र, काही शहाणी, शिकली सवरलेली माणसं संचारबंदीतही काही कारणं सांगून बाहेर फिरताना दिसतात. काही लोक जाणिवपूर्वक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला जर एखादा माईक किंवा छोटी साऊंड सिस्टीम मिळाली तर मी सर्वत्र फिरून प्रबोधनासाठी तयार आहे.'' 

श्री.पाटोळे सांगतात... 

एकीकडे प्रशासन कोरोनामुक्तीसाठी कसोशीने प्रयत्न करत असताना साऱ्यांनी मिळून प्रशासनाला साथ दिली पाहिजे. चौदा एप्रिलपर्यत लॉकडाऊन आहे. आपण सर्वांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही तर मग चौदा एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढू शकतो आणि त्यानंतर आपल्या हातात फक्त दोनच गोष्टी असतील एक म्हणजे कोरोना आणि दुसरी म्हणजे उपासमारी....!
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baburao Patole is propagating on corona in kolhapur