देवेंद्र फडणवीस म्हणतात  निर्णय घ्या.. मग तो कोठून ही घ्या.... 

लुमाकांत नलवडे
Saturday, 29 August 2020

देवेंद्र फडणवीस गेली दोन दिवस ते पश्‍चिम महाराष्ट्रचा दौरा करीत आहेत

कोल्हापूर : आपली अकार्यक्षमता लपविण्यासाठी केंद्र सरकारकडून काहीच मदत येत नसल्याचे भासविले जात आहे. प्रत्यक्षात पीएम केअर मधून सर्वाधिक मदत महाराष्ट्र सरकारला झाली आहे. ही लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध नव्हे तर कोरोना विरुद्ध आहे. त्यामुळे निर्णय मातोश्री वरून घ्या, वर्षावरून घ्या, मंत्रालयातून घ्या अन्यथा दौरा करून घ्या. पण निर्णय घ्या. उशिरा झालेल्या निर्णयाला अर्थ राहणार नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी पाठविलेल्या तीनशे आयसीयु आणि चारशे ऑक्‍सिजन बेडचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी विनाविलंब मंजुर करावा. याबाबत मी स्वतः मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना हे ज्ञात करून देणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 
गेली दोन दिवस ते पश्‍चिम महाराष्ट्रचा दौरा करीत आहेत. आज दुपारी दोनच्या सुमारास ते कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी छत्रपती प्रमीलाराजे रुग्णालय (सीपीआर) मध्ये भेट देवून माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात धावती आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारला आम्ही सहकार्य करत आहे. अधिवेशन दोन दिवसांचे असावे हा निर्णय घेतला. प्रश्‍नोत्तरे नाहीत असा निर्णय घेतला त्याला आम्ही सहाकार्य केले. कोरोना लढाईत आम्ही सरकार सोबत आहोत. तरीही मंत्रिमंडळातील सर्वांकडून केवळ केंद्र शासनाकडून निधी येत नसल्याची ओरड केली जाते. प्रत्यक्षात सर्वात अधिक महाराष्ट्राला निधी मिळाला आहे. सरकारकडूनही प्रोऍक्‍टीव्ह रोल पाहिजेत असे होताना दिसत नाही. 

हेही वाचा- मोठा निर्णय :  पिरनवाडी प्रकरण ; छत्रपती शिवाजी महाराज चौक नावासह रायण्णा पुतळाही कायम

दारू, मॉल चालतात..मंदिरे का नाहीत? 
सध्या सरकारकडून दारू दुकान सुरू केले. मॉल सुरू केले. मात्र मंदिरे सुरू केलेली नाहीत. ज्या राज्यांत मंदिरे सुरू आहे, तेथे त्यांच्यामुळे संसर्ग वाढला आहे असे दिसून आले नाही. दारू, मॉल चालतात तर मंदिरे का नाही असा आमचा सवाल आहे. आज राज्यभर आंदोलन झाले आमचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील त्यामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे मंदिरे सुरू करण्याबाबतही सरकारने तातडीने निर्णय घेतला पाहिजे. 

मेट्रोसंदर्भावरील प्रश्‍नांवर  फडणवीस म्हणाले, ''2022 मध्ये हे काम पूर्ण झाले असते. मात्र आता त्याला आणखी दीड-दोन वर्ष जादा लागणार आहेत. रोज कोट्यवधींनी प्रोजक्‍टचा खर्च वाढत आहे. जपानी कंपनीने त्याचा सर्व्हे केला होता. त्यांच्याकडून पुन्हा त्याची माहिती घेवून सर्व्हे करावा लागेल. नव्याने जागा पहावी लागेल. त्यामुळे प्रोजक्‍ट स्थगित ठेवून सरकारने योग्य काम केले नाही.

हेही वाचा- दार उघड उद्धवा दार उघड : कोल्हापूरातील दहा मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन

'' दरम्यान सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले " आमच्या त्याच्याशी काहीच संबंध नाही. केवळ नाकर्तेपणा लपविण्यासाठी आम्हाला त्यामध्ये ओढले जात आहे. त्याबाबत मी कोणतीही टिका करणार नाही.'' याच बरोबर कोल्हापुरातील स्थानिक रेड आणि ब्ल्यू लाईनचा प्रश्‍न राज्यकर्त्यांनी सोडविला पाहिजे. त्याबाबत मी काही बोलणार नाही.पण अलमट्टी धरणाची उंची वाढवणे हे खपवून घेणार नाही. ते बांधतानाच विरोध केला असता तर आत्ता ही परिस्थिती आली नसती.'' यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकात पाटील, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: background of  covid 19  Former Chief Minister Devendra Fadnavis visits kolhapur CPR Hospital