लाखाला सहा हजार व्याज कसे ?

सुधाकर काशीद
शनिवार, 25 जानेवारी 2020

कोल्हापुरात एक लाख रुपये भरले, की महिन्याला पाच ते सहा हजार रुपये इतका परतावा देणारी यंत्रणा कार्यरत झाली असल्याची चर्चा आहे.

कोल्हापूर - लाखभर रुपये बॅंकेत ठेवले, की महिन्याला व्याज किती मिळते, साधारण ३५० ते ८०० रुपये. पण, कोल्हापुरात एक लाख रुपये भरले, की महिन्याला पाच ते सहा हजार रुपये इतका परतावा देणारी यंत्रणा कार्यरत झाली असल्याची चर्चा आहे. विशेष हे, की दोन महिने झाले, या यंत्रणेने लाखाला पाच ते सहा हजार रुपये परतावा देत बऱ्यापैकी ‘विश्वास’ संपादन केला आहे. 

दरमहा अव्वाच्या सव्वा व्याजाचे आमिष दाखविणारी यंत्रणा

पण, आर्थिक क्षेत्रातील फसवणुकीच्या घटनांचा वेध घेता, अशा स्वरूपाचे आमिष दाखविणाऱ्या अनेक संस्थांनी यापूर्वी रातोरात आपला गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे आता कार्यान्वित झालेली ही यंत्रणा कितपत भरवशाची, याची छाननी होण्याची गरज आहे. कारण लाखाला महिन्याला पाच ते सहा हजार रुपये परतावा कोणीही सातत्याने देऊ शकत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य असले तरीही अनेक जण पैसे गुंतवत आहेत.
विश्वसनीय माहितीनुसार या यंत्रणेने कोल्हापुरात आपले कार्यालय उघडले आहे. विशेष हे, की २० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार धनादेशाने करायचा नियम आहे. पण, ही यंत्रणा सारे पैसे रोखीने स्वीकारते. तुम्ही लाखभर रुपये ठेवण्याची तयारी दर्शवली, की सुटाबुटातले प्रतिनिधी घरी येतात. योजनेची माहिती देतात. याशिवाय, नव्याने गुंतवणूकदार मिळावेत म्हणून मोठ्या हॉटेलमध्ये बैठकांचे आयोजन केले जाते. एखाद्याने फसवणुकीची भीती व्यक्त केली, की या जगात सगळेच काही वाईट नसते. विश्वास ठेवावा, अशी भाषणे करून गुंतवणूकदाराला भावनिक केले जाते. पैसे भरून घेतले, की पावती दिली जाते. पण, ती पावती पक्की नाही, हे सांगितले जाते. आता दोन-तीन महिने झाले, ही गुंतवणुकीची यंत्रणा कार्यान्वित आहे. विशेष हे, की त्यांनी ठेवीदारांना लाखाला पाच ते सहा हजार रुपये परतावा दिला आहे. पण, खरी मेख इथेच आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्याचा हा एक भाग आहे. कारण यापूर्वी कोल्हापुरातून रातोरात गायब झालेल्या आर्थिक संस्थांनी याच पद्धतीने व्यवहार करून ठेवीदारांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.

वाचा - कोल्हापुरची दंगल गर्ल रेश्मा वर का घातली गेलीय बंदी...?

छाननीची गरज 

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस एखाद्या प्रकरणात फसवणूक झाली किंवा कोणी तक्रार केली तर यात लक्ष घालू शकतात. ते आधीच एखाद्या गुंतवणूकदार संस्थेला संशयाच्या फेऱ्यात अडकवू शकत नाहीत आणि नेमका याचाच फायदा या संस्था घेतात. आता कोल्हापुरात अशा प्रकारची गुंतवणूक सुरू आहे.  

फसवणूक टाळण्यासाठी...

क्षणभर असे समजू, की गुंतवणूक करून घेणाऱ्या या संस्था अधिकृत आहेत. पण, कोणीतरी जागरूक गुंतवणूकदाराने गुंतवणुकीपूर्वी खोलात जाण्याची गरज आहे. त्यामुळे भविष्यातील फसवणूक टळेल. कोल्हापुरात यापूर्वी आकर्षक जाहिराती करून आकर्षक योजनांचा गाजावाजा करून ११ ते १२ संस्थांनी फसवणूक केल्याचा इतिहास आहे. गुंतवणूदार घिरट्या घालून-घालून थकले आहेत. त्यांचे आर्थिक नुकसान तर झाले आहेच. पण, मानसिक खच्चीकरणही झाले. त्यामुळे कोल्हापूरकरांनी ताकही फुंकून पिण्याची गरज आहे.

गुंतवणूक स्वीकारून अव्वाच्या सव्वा व्याजाचे आमिष दाखवत असेल तर गुंतवणूकदार संस्थेची छाननी करू शकतात. शंभर रुपयांना जास्तीत जास्त किती व्याज देतात, त्याची मर्यादा आहे. पण, लाखाला पाच-सहा हजार म्हणजे थोडी शंका वाटते. खात्री करून गुंतवणूक करावी.
- राजू शहा, अध्यक्ष, कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bait of interest by cheaters in kolhapur marathi news