Positive Story: मुलगा अधिकारी न होता कॅन्सरने गेला; म्हणून बाजीराव गावातील मुले अधिकारी होण्यासाठी करतात धडपड

Bajirao Kamble from Mhasve has donated books to the study center for his children's dreams.jpg
Bajirao Kamble from Mhasve has donated books to the study center for his children's dreams.jpg

कोनवडे (कोल्हापूर) : घरी अठराविश्व दारिद्र्य रात्रंदिवस अभ्यास करून एमपीएससी पास व्हायचे आणि मोठा अधिकारी बनायचे हेच त्याचे ध्येय. त्या दिशेने तो राबत होता पण नियतिला ते मान्य नव्हते आणि त्याचे अधिकारी होण्याचे स्वप्न त्याच्या अकाली निधनाने अधुरेच राहिले ही दुर्दैवी कहाणी आहे. म्हसवे (ता. भुदरगड) येथील शहाजी कांबळे या तरुणाची व त्यांच्या वडिलांची. माझा मुलगा अधिकारी नाही झाला तरी गावातील मुले अधिकारी बनतील म्हणून बाजीराव मारुती कांबळे या निरक्षर पित्याने ग्रामपंचायतीच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या एमपीएससी अभ्यास केंद्राला पुस्तके भेट देऊन आपल्या मुलाचे स्वप्न गावातील मुलांनी अधिकारी बनून पूर्ण करावे, अशी भावना व्यक्त करत मुलास आगळी वेगळी श्रद्धांजली वाहिली.

म्हसवे येथील बाजीराव मारुती कांबळे यांचा मुलगा शहाजी उर्फ सुनील कांबळे घरात अठराविश्व दारिद्र्य वडील चरितार्थासाठी वाटेल ते काम करून घर चालवत होते. मोलमजुरी, गवंड्याच्या हाताखाली मजुरी, उन्हाळ्यात गारेगार विकणे हे काम ते करायचे जोडीला पत्नीची साथ नेहमी असायची. एक मुलगा एक मुलगी असे सुखी कुटुंब होते. दहावीत मुलगी गुणवत्ता यादीत आली.

या कुटुंबाला आनंदाला पारावारा उरला नव्हता. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. दहावीनंतर मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने बाजीराव व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला. मुलीचा अकाली मृत्यू आता मुलाला शिकवायचे एवढेच ध्येय. पडेल ती मोलमजुरी करून वडिलांनी मुलाला बीकॉम पर्यंत शिक्षण दिले. वडिलांचे कष्ट त्याच्या डोळ्यासमोर दिसत होते. वडिलांच्या गरिबीचे पांग फेडायचे. या जिद्दीने नरके फाउंडेशनमध्ये ऍडमिशन घेऊन तो जिद्दीने अभ्यासाला लागला.

एमपीएससी परीक्षा कांही गुणांनी हुकली, मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही. तो गावातील अभ्यास केंद्रात रमला. मुलांनाही तो मार्गदर्शन करत राहिला. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. अचानक त्याला गंभीर आजाराची लक्षणे दिसू लागली. कोल्हापूर येथील दवाखान्यात त्याला दाखल केले. यावेळी त्याचे कॅन्सरचे निदान झाल्याने वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली. मोलमजुरी करून पोट भरणे अशी परिस्थिती होती. या परिस्थितीत मोठ्या दवाखान्यात दाखल करणे अशक्य होते. मात्र, त्याच्यावर दवाखान्यात औषध उपचार सुरूच ठेवले. स्वतःचे घर विकून त्याच्यावर उपचार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. काही करून तो या आजारातून बरा झाला पाहिजे हेच वडिलांचे ध्येय होते. 

आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून त्याच्यावर मुंबईतील टाटा हॉस्पिटल येथेही उपचार सुरु झाले. त्याची तब्येत हळूहळू सुधारू लागली. कुटुंबही आनंदित झाले आणि कोरोना महामारी सुरु झाल्याने मुंबई येथे उपचार घेणे थांबले आणि सुनीलची तब्येत ढासळत गेली. उपचाराअभावी सुनीलचा मृत्यू वडिलांना डोळ्यापुढे पाहावा लागला. मुलीचे निधन पाठोपाठ मुलाच्या निधनाने बाजीराव त्यांचे कुटुंबीय पोरके झाले. मात्र वडिलांनी माझा मुलगा भले अधिकारी झाला नाही, पण गावातील मुले अधिकारी बनतील. या उद्देशाने त्यांनी व त्यांच्या समाजाने हजारो रुपयांची पुस्तके गावातील एमपीएससी केंद्राला भेट देऊन मुलास श्रद्धांजली अर्पण केली. डोंगरएवढ्या दुःखद प्रसंगीही बाजीराव कांबळे यांनी राबवलेल्या विधायक उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.


संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com