
कोल्हापूर : "बाप्पा मोरया, कोरोनाला हरवूया' असा निर्धार करत आज घरोघरी विघ्नहर्त्या बाप्पांचे स्वागत झाले. पहाटेपासूनच कुंभार गल्ल्यांमध्ये मुर्ती नेण्यासाठी कोल्हापूरकरांनी पारंपरिक वेशभूषेत हजेरी लावली. प्रशासन व कुंभार समाजाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या चार दिवसात सत्तर ते ऐंशी टक्क्याहून अधिक कुटुंबांनी मुर्ती नेल्याने प्रत्येक वर्षीच्या तुलनेत दिवसभर गर्दी कमी राहिली. अधून मधून पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र, तरीही सळसळत्या उत्साहात "मोरयाऽऽऽ'चा गजर, फटाक्यांची आतषबाजी करीत गणेश आगमन सोहळा सजला.
दरम्यान, दुपारी एकपर्यंत गंगावेश, पापाची तिकटी, शाहूपुरी, बापट कॅम्प परिसरात मुर्ती नेण्यावर अनेकांनी भर दिला. सायंकाळी तरूण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मुर्ती नेल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त असून यंदा वाद्ये आणि ध्वनीयंत्रणेशिवाय आगमन सोहळा सजला.
सकाळपासूनच घरांघरांत गणेश आगमनाची धांदल सुरू झाली. दारात सडा टाकून रांगोळी सजली आणि त्याचवेळी "गणराज माझा नाचत आला', "बाप्पा तुम्ही या..' अशा गीतांनी सारा माहौल भक्तीमय झाला. मोजक्याच लोकांनी मुर्ती आणायची असल्याने अनेकांनी घरातील केवळ दोन ते तीन सदस्यांना घेवूनच मुर्ती आणली. घरी मुर्तीची विधीवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर आरती आणि त्यानंतर मोदक व खिरीचा आनंद घेत मंडळांच्या बाप्पांना आणण्यासाठीची धांदल पुन्हा सुरू झाली.
वाद्यांशिवाय आगमन...
गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीला परवानगी नसल्याने यंदा फारशी कुठेच वाद्यपथके दिसली नाहीत. त्यामुळे केवळ "मोरया'चा गजर आणि फटाक्यांच्या साक्षीनेच आगमन सोहळा सजला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत बाप्पांचे आगमन केले तर काहींनी सजवलेल्या हातगाडीवरून बाप्पांना घरी नेले. तटाकडील तालीम मंडळाचा बाप्पा सायंकाळी सहाच्या सुमारास पापाची तिकटी येथून तालमीकडे मार्गस्थ झाला.
पोलिसांना उसंत...
बंदोबस्तावरील पोलिसांना यंदा पहिल्यांदाच उसंत मिळाली. मात्र, कुठेही गर्दी होणार नाही, याची खबरदारी ते घेत होते. कुंभारगल्ल्यांत गर्दी कमी असल्याने काही पोलिसांनी आगमन सोहळ्याला "मोरया'च्या गजरात साथ दिली. एकूणच या आनंद सोहळ्यात पोलिसही नकळतपणे सहभागी झाले आणि त्यांच्यावर एरवी असणारा तणाव कुठच्या कुठे पळून गेला.
दीड दिवसांचे विसर्जन
दीड दिवसांच्या बाप्पांचे आज (रविवारी) विसर्जन होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मंडळांनीही दीड दिवस मुर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज दुपारी ही मंडळे मुर्तीचे विसर्जन करणार आहेत. राजारामपुरी शिवाजी तरूण मंडळाच्या बाप्पांचे विसर्जन दुपारी साडेबाराला होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.