esakal | तेरा चौदा वाढप्यांना नदीकाठाचा आधार
sakal

बोलून बातमी शोधा

The base of the river for thirteen fourteen boomers

ते गेले 27 दिवस पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाच्या एका कमानीखाली राहतात. समोर पंचगंगेचे पात्र, डोक्‍यावर पुलाची अर्धवर्तुळाकार कमान, दोन्ही बाजूला शेतवड आणि पुलाच्या ऐसपैस कट्ट्यावर यांच्या वळकटी आहेत.

तेरा चौदा वाढप्यांना नदीकाठाचा आधार

sakal_logo
By
सुधाकर काशीद

कोल्हापूर : ते गेले 27 दिवस पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाच्या एका कमानीखाली राहतात. समोर पंचगंगेचे पात्र, डोक्‍यावर पुलाची अर्धवर्तुळाकार कमान, दोन्ही बाजूला शेतवड आणि पुलाच्या ऐसपैस कट्ट्यावर यांच्या वळकटी आहेत. जवळच तीन दगडाची चूल आहे, त्या चुलीवर ते सर्वांसाठी काही तरी शिजवतात. काही स्वंयसेवी संस्था त्यांना डाळ, भात आणून देतात. दिवसभर नदीचा काठ प्रसन्न वाटतो. पण दिवस मावळला, की नदीकाठ भीती वाटण्यासारखा जाणवतो. 

या परिस्थितीत पुलाखाली राहणारे हे तेरा चौदा जण कोल्हापुरात वाढपी काम करणारे आहेत. कोठेही जेवणाचा कार्यक्रम असू दे, तेथे रोज दोन हजार लोकांच्या पंक्तीत ते वाढतात. ते जिल्ह्याच्या विविध भागातले आहेत. वाढपी हा उदरनिर्वाहाचा मार्ग आहे. 22 मार्चला लॉकडाउन झाले आणि सर्व मोठे धार्मिक, घरगुती कार्यक्रम थांबले. जेवणावळी थांबल्या. पहिले दोन चार दिवस त्यांना परिस्थितीचे गांभीर्य ध्यानात आले नाही. त्यानंतर मात्र लॉकडाऊनची तीव्रता वाढली. ते नदीचा घाट हा आधार म्हणून तेथे एकत्र आले पण तेथे एकत्र राहणे. लॉकडाउनच्या नियमांचा भंग करणारे होते.

त्यामुळे ते पुलाच्या कमानीखाली गेले. पुलाचा कट्टा स्वच्छ केला व तेथे राहू लागले. लॉकडाउन संपेपर्यंत पुलाखालून बाहेर पडायचे नाही, हे त्यांनी ठरवले. त्यांची अवस्था ओळखून इर्शाद बंडवल, बैतुलमाल कमिटी त्यांना डाळ भात देत. पण हे एका चुलीवर भाजी किंवा एखादा दुसरा पदार्थ करतात. पुलाच्या कठड्यापासून पंधरा वीस फुटावर नदीचे पात्र, त्यामुळे दोघे तिघे काठीला गळ लावून मासे पकडतात. माशाचे सांबार करतात. काठावर दिवसभर राहणे खूप आल्हाददायक वाटते. पण अंधार पडू लागला की नदीची भीती वाटायला लागते. एखाद्या माशाने पाण्यात उसळी मारली तरी शांत वातावरण भंग पावते.

काही दिवसात नदीच्या पात्रात मगरीचा वावर आहे. या सर्वांना मगर एकदाच दिसली आहे. बाकी कोणताही त्रास नाही. यांनीही पुलाखालून बाहेर पडणे टाळले आहे. त्याच्यातला अजित मिसाळ त्यांच्यासाठी काही तरी खरेदी करून आणतो. रात्री पुलाखाली ते कसे काय राहतात? हा प्रश्‍न अनेकांना पडतो. पण ते आता सरावले आहेत. त्यांनी लॉकडाउन उठेपर्यंत पुलाखालून बाहेर पडायचे नाही असे ठरवले आहे. लॉकडाउनचे विविध समाजघटकांवर कसे परिणाम झाले आहेत. पण तरीही ते लॉकडाउनचे पालन कसे करतात याचे हे उदाहरण आहे. 

go to top