हुपरीतील सूर्य तलावाचे सुशोभीकरण रखडले

The Beautification Of Surya Lake In Hupari Was Delayed Kolhapur Marathi News
The Beautification Of Surya Lake In Hupari Was Delayed Kolhapur Marathi News

हुपरी : मालकी हस्तांतरण प्रक्रिया लाल फितीच्या कारभारात अडकल्याने येथील सूर्यतलावाच्या सुशोभीकरणाचे काम रखडलेलेच आहे. तलावाच्या कामासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून पालिकेला एक कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन वर्ष होत आले तरी अद्याप प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सूर्यतलावाच्या सुशोभीकरणाचा "सूर्य' उगवणार तरी कधी? असा प्रश्‍न हुपरीवासीयांना पडला आहे. 

भविष्यात शहराला भूषणावह ठरेल अशा मध्यवर्ती ठिकाणी तलाव आहे. शेजारीच असलेले नवीन बस स्थानक, पोलिस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, महाविद्यालये याबरोबरच व्यापारी केंद्रे, लोकवस्ती यामुळे अलीकडच्या काळात सूर्यतलावाचे महत्त्व वाढले आहे. चांदी कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष सूर्योपासक दिवंगत य. रा. नाईक यांनी तलावात सूर्य मंदिर उभारून तलावाचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून तळ्याला सूर्य तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. विपुल मत्स्यसंपदा, पक्षांची गर्दी व निसर्गरम्य परिसर यांनी परिपूर्ण असणारा सूर्य तलाव काळाच्या ओघात प्रदूषणाचा बळी ठरला आहे. सांडपाणी, कचरा, कपडे, जनावरे धुने, वाढलेल्या पान वनस्पती यामुळे तलावाला सध्या ओंगळवाणे स्वरुप आले आहे. 

पालिका प्रशासन, पोलिस, सामाजिक संघटना, मंडळे आदी घटकांनी श्रमदान करून तलाव प्रदूषण मुक्ती बरोबरच सुशोभीकरणासाठी प्रयत्न केले; पण ते प्रयत्न तोकडे ठरले. परिणामी सुशोभीकरणाच्या कामाला खीळ बसली आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते महावीर गाट, युवा कार्यकर्ते अमित गाट आदींनी तलाव सुशोभीकरण कामासाठी शासन दरबारी पाठपुरावा केल्याने राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गतून गत फेब्रुवारी 2020 मध्ये 93 लाख 54 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानुसार प्राथमिक कामासाठी 10 लाख रुपये पालिकेला उपलब्ध झाले आहेत. 

निधी मंजूर होऊन वर्ष होत आले; पण तलावाची मालकीच पालिकेकडे नाही. त्यामुळे काम रखडले असल्याचे चित्र समोर आले आहे. याबाबत माहिती घेतली असता तलाव हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संदर्भातील फाईल शासकीय कार्यालयात अडकून पडल्याने सुशोभीकरण प्रक्रियेला खीळ बसली आहे. या संदर्भात शासकीय अधिकारी तसेच पालिका प्रशासनाने गतीने हालचाल करून सूर्यतलाव सुशोभीकरणाच्या कामास गती देण्याची गरज व्यक्त होत आहे. 

काम मार्गी लागण्यासाठी प्रयत्नशील
पालिकेचा हा एक महत्त्वाकांक्षी संकल्प असून शहराच्या सौंदर्यात भर घालू शकेल अशा पद्धतीने सूर्यतलावाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचे आराखडाबद्ध नियोजन आहे. तलावात मिसळणाऱ्या सांडपाण्याची काही दिवसांपूर्वीच पर्यायी व्यवस्था करून प्रदूषण रोखले आहे. सर्वांना सोबत घेऊन शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून लवकरच तलावाचे काम मार्गी लागण्यासाठी प्रयत्नशील आहे. 
- जयश्री गाट, हुपरी 

दृष्टिक्षेपात 
- आधी गाढव तळे पण सध्या सूर्यतलाव अशी ख्याती 
- सुमारे अडीच एकर तलावाचा परिसर 
- मध्यभागी सूर्य मंदिरा बरोबरच आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळा अथवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाची मागणी 
- तलावासभोवती रंकाळा तलावाच्या धर्तीवर संरक्षक कठडे, पादचारी मार्ग, शोभिवंत वृक्ष, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, पथदिवे, रोषणाई 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com