गणेश मंडळांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत 'हे' आदेश

मिलिंद देसाई
Wednesday, 12 August 2020

मंदिरामध्ये प्रतिष्ठापना केली जाणारी गणेशमूर्ती कमाल 4 फूट तर घरगुती गणेशमूर्ती कमाल 2 फूटावर नसावी. 

बेळगाव :  गणेशोत्सव मंडळांनी यंदा सार्वजनिक गणेश मुर्तींचे मंडप न घालता आपल्या परिसरातील मंदिरांमध्ये गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असा आदेश जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी बजावला आहे. यासह सार्वजनिक गणेश मूर्तींची कमाल उंची 4 फूट ठेवण्याचे देखिल आदेशात म्हटले आहे. 

कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. 12) याबाबतचे आदेश बजावले आहेत. आदेशात त्यांनी असे म्हटले आहे की, बेळगाव जिल्ह्यात सध्या 3324 कोरोनाबाधित आढळून आले असून काल (ता. 11) एकाच दिवसात 575 जण संसग्रबाधित झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 439 कन्टेन्मेंट झोन स्थापन्यात आले असून दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोना संबंधी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार एखाद्या प्रदेशात मोठ्या संख्येने लोक जमण्यावर निर्बंध आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या थांबविण्यासाठी यंदा सार्वजनिक गणेश मूर्ती मंडपात प्रतिष्ठापीत न करता त्यांची नजिकच्या मंदिरातच प्रतिष्ठापना करावी. 

मंदिरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करताना आवश्‍यक ती खबरदारी घेण्यासह कोरोना नियमावलीचे देखील पालन करण्याचे आदेशात बजावण्यात आले आहे. 

काय म्हटले आहे आदेशात

मंदिरामध्ये प्रतिष्ठापना केली जाणारी गणेशमूर्ती कमाल 4 फूट तर घरगुती गणेशमूर्ती कमाल 2 फूटावर नसावी. 

पीओपी ऐवजी मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी.
देवस्थान मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मूर्ती प्रतिष्ठापना करण्यापूर्वी पोलिस, स्थानिक प्रशासन, अग्नीशमन, हेस्कॉम, आरोग्य, प्रदुषण नियंत्रण आदी खात्यांची रितसर परवानगी मिळवावी. 

मंडळांनी मंदिरात कोरोना रोगाबाबत जागृती निर्माण करणाऱ्या जाहीराती कराव्यात. 

इतर जाहीरातबाजी आणि लोकांची गर्दी होईल, असे कार्यक्रम घेऊ नयेत. 

सांस्कृतीक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांऐवजी आरोग्य आणि स्वच्छते संबंधीत कार्यक्रम घ्यावेत. 

गणेशोत्सवावेळी केवळ पाच जणांची उपस्थिती राहावी. 

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रदर्शनासाठी आणि नागरिकांना गणेश दर्शन व्हावे यासाठी केबल नेटवर्क, फेसबुक लाईव्ह यासह सोशल मीडियाचा वापर करावा.

मंदिरामध्ये रोज सॅनिटायझींग करावे. दर्शनासाठी येणाऱ्यांचे थर्मल स्क्रीनिंग केले जावे. तसेच दर्शनावेळी 6 फूट अंतराचे सोशल डिस्टंसिंग पाळले जावे. मास्क सक्‍ती असावी. 

हे पण वाचा बाळ जन्मले पण आईचा मृत्यू झाला अन् त्याची मृत्यूशी झुंज सुरू झाली पण... 

गणेश मूर्ती आणताना तसेच विसर्जनावेळी कोणतीही मिरवणूक काढली जाऊ नये. सर्व गणेश मूर्ती विसर्जन एकाच वेळी केली जाऊ नये. 

मंडळांनी गणेश विसर्जनासाठी जवळचे मार्ग निवडावेत. 

संसर्ग रोखण्यासाठी वेळोवेळी जिल्हा प्रशासन व इतर विभागाकडून जाहीर केल्या जाणाऱ्या नियमांचे पालन केले जावे. 

संपादन- धनाजी सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: belgaum collector order to ganesh mandal