आयपीएलच्या सामन्यावर बेटींग ; एकास अटक 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 October 2020

सांगलीतून कोल्हापुरात आल्यानंतर कोणीही ओळखणार नाही या उद्देशाने त्याने येथे बेटिंग घेतल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे

कोल्हापूर - तावडे हॉटेल येथील तनवाणी हॉटेलवर आयपीएलच्या सामान्यावर जुगार (बेटींग) घेणाऱ्या सांगलीतील एकास अटक करण्यात आली. उमेश नंदकुमार शिंदे (वय 39,रा. आकाशवाणी केंद्राच्या मागे, राधागोविंद हॉस्पीटलजवळ, ता.मिरज, जि.सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

आयपीएलच्या "कलकत्ता नाईट' विरुद्ध "सनराईज हैदराबाद' क्रिकेट सामान्यावर काल तो बेटींग घेत होता. तो सांगलीतील सनी उर्फ मिलिंद शेटे (रा.वखारभाग,सांगली) याच्यासाठी काम करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्याकडून 36 हजार 611 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले, की सध्या आयपीएल हे क्रिकेटचे सामने सुरू आहेत. दुबईत सुरू असलेल्या या सामन्यांवर बेटींग घेवून जुगार खेळण्यासाठी सांगलीतील तरुण कोल्हापुरात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथके तयार करून पाहणी सुरू होती. काल तावडे हॉटेल परिसरातील तनवाणी हॉटेल व लॉजिंग येथे छापा टाकला तेंव्हा रुम नं. 207 मध्ये संशयित शिंदे बेटींग घेत होता. त्याला पकडल्यानंतर त्याच्याकडून एक लॅपटॉप, चार मोबाइल हॅण्डसेट, हिशेब करण्यासाठी दोन कॅलक्‍युलेटर व इतर साहित्यासह सामन्यावर बेटींग घेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला अटक केली. 

सांगलीतून कोल्हापुरात आल्यानंतर कोणीही ओळखणार नाही या उद्देशाने त्याने येथे बेटिंग घेतल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. अधिक चौकशीत सांगलीतीलच राहणारा सनी उर्फ मिलिंद शेटे (वखारभाग,सांगली) याच्याकडे देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे. त्याच्याकडून एक लॅपटॉप, चार मोबाइल हॅण्डसेट, दोन कॅलक्‍युलेटर, एटीएम कार्ड असा सुमारे 36 हजार 611 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

हे पण वाचाजोतिबाची तिसऱ्या दिवशी पाच पाकळी सोहन कमळ पुष्पातील महापूजा 

पोलिस अधीक्षक शैलेश बलवकडे यांनी 15 ऑक्‍टोबरच्या बैठकीत बेटींगसह अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पथकांची नियुक्ती केली होती. यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले, संतोष पवार, पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय पडवळ, कृष्णात पिंगळे, अनमोल पवार, संतोष पाटील यांनी ही कारवाई केली. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Betting on IPL matches One arrested in kolhapur