अखेर मणगुत्तीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

छत्रपती शिवाजी महाराजांचा ५ आॅगस्टला प्रतिष्ठापना केलेला पुतळा ७ आॅगस्ट रोजी चबुतऱ्यावरून उतरविल्याने तणाव निर्माण झाला होता.

हुक्केरी : मणगुती (ता. हुक्केरी) येथे प्रतिष्ठापना केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उतरविण्यात आल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावर तोडगा काढून गावकऱ्यांच्या मागणीनुसार एकाच ठिकाणी बसस्थानकानजीक छत्रपती शिवाजी महाराज व महर्षी वाल्मिकी यांचे पुतळे बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज (ता. १७) दुपारी १२ वाजता आमदार सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते दोन्ही पुतळ्यांच्या चुबुतऱ्यांचे भूमिपूजन झाले. त्यामुळे कर्नाटक-महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या लढ्याला यश आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा ५ आॅगस्टला प्रतिष्ठापना केलेला पुतळा ७ आॅगस्ट रोजी चबुतऱ्यावरून उतरविल्याने तणाव निर्माण झाला होता. १० आॅगस्टला कर्नाटक-महाराष्ट्रातील शिवप्रेमी एकवटल्याने मणगुत्तीमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. 

गेल्या मंगळवारी (ता. ६) आमदार सतीश जारकिहोळी यांनी मणगुतीला भेट देऊन जागेसंदर्भातील वाद मिटवला होता. तसेच बसस्थानकाजवळ दोन्ही पुतळे उभारण्याचा निर्णय सर्वांच्या संमतीने घेण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार चबुतऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमात आमदार जारकिहोळी यांचा ग्रामस्थांतर्फे शाल, श्रीफळ, पुष्पहार व राजर्षी शाहू महाराजांची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी आमदार जारकिहोळी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व महर्षी वाल्मिकी पुतळ्यांच्या उभारणीसाठी आवश्यक ती मदत आपण करणार आहोत. मणगुत्ती, बेनकनहोळी व बोळशनट्टी ही गावे एकत्रितपणे विविध उत्सव साजरे करतात. पुतळ्यावरून मध्यंतरी झालेली गैरसमजूत आता दूर झाली आहे. तीनही गावांनी एकत्रित राहून प्रगती साधून परिसरात आदर्श निर्माण करावा.

हे पण वाचाअबकारीची मोठी कारवाई ; उसाच्या शेतातून 131 किलो गांजा जप्त

यावेळी तालुका पंचायत सदस्य सुरेश बेण्णी, ग्राम पंचायत सदस्य रमेश पाटील, सतबा कदम, किरण राजपुत, जिवप्पा चौगुले, तुकाराम धनाजी, शरद पाटील, झुंजार पाटील, लक्ष्मण आनंद, अर्जुन घस्ती, बसू दरनट्टी, रमेश भुजाप्पगोळ यांच्यासह विविध तरुण मंडळांचे कार्यकर्ते, मणगुत्ती, बेनकनहोळी व बोळशनट्टी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhumi Pujan of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Mangutti