सायकलच्या बाजारपेठेत तेजी; देशी बनावटीच्या सायकलसह विदेशी सायकलला अधिक मागणी

सुयोग घाटगे 
Friday, 8 January 2021

सायकलच्‍या किमती वधारल्या आठवड्यात १० टक्क्यांनी वाढ

कोल्हापूर : मागणी अधिक आणि पुरवठा कमी या सिद्धांतानुसार शहरातील सायकलच्या किमती वधारल्या आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सायकलच्या सुट्याभागाच्या उत्पादनावर आणि किमतीवर झालेल्या परिणामामुळे या किंमती वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. कोरोनाच्या कालावधीत लॉकडाउनने हैराण झालेल्या अनेकांनी अनलॉकमध्ये स्वतःचा फिटनेस राखण्यासाठी सायकलचा आधार घेतला. यामुळे सायकलच्या बाजारपेठेत तेजी आली. ज्या ठिकाणी महिन्याकाठी ५० ते ६० सायकल विकल्या जात होत्या, त्या ठिकाणी २०० ते २५० सायकल विक्री होऊ लागल्या. यामुळे देशी बनावटीच्या सायकलसह विदेशी सायकल विकल्या गेल्या.

चार महिने चालेल्या या तेजीमुळे उत्पादक कंपन्यांवर दबाव आला तर सुट्टेभाग उत्पादन करणारे, निर्यात करणारे यांच्याकडील मालाचा तुटवडा निर्माण झाला. शिवाय शहरातील सायकलच्या मागणीत अजूनही वाढच होत असल्यामुळे या किमती दिवसागणिक वाढतच आहेत. महिनाभरात या किमती १० टक्‍क्‍यांवरून वाढत जाऊन २५ टक्केपर्यंत वाढल्या आहेत. 

हेही वाचा- मित्राला आला सांगलीतून एक फोन अन् -

दोन ते तीन आठवड्यांचे वेटिंग आणि ॲडव्हान्स बुकिंगने सध्या सायकल विक्री सुरू आहे. उत्पादकांना अधिक किंमतीने सुट्टे भाग खरेदी करावे लागत असल्यामुळे त्यांच्याकडूनच किंमती वाढल्या आहेत.
- गिरीश परमाळे, सायकल विक्रेते

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bicycle prices rise by 10 per cent in a week