...यामुळे कुजला चंदगड तालुक्यातील कोट्यवधींचा शेती माल

सुनील कोंडुसकर
मंगळवार, 30 जून 2020

मार्च महिन्याच्या अखेरीला कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर सुमारे तीन महिने सर्व व्यवहार ठप्प झाले. या कालावधीत शेत मालाच्या वाहतुकीला, विक्रीला परवानगी होती; परंतु चंदगडच्या शेतकऱ्याला सर्वात जवळची बेळगाव बाजार समिती दीर्घ काळ बंद राहिली.

चंदगड : तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपआवाराचे महत्त्व आता तरी समजणार का? असा प्रश्‍न विचारला जात आहे. लॉकडाउनमुळे बेळगाव बाजार समिती बंद झाल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा कोट्यवधी रुपयांचा शेत माल कुजून गेला. तुर्केवाडी आवार सुरू असते, तर येथे व्यवहार होऊन शेतकरी तगला असताच; परंतु तोट्यातून मार्गक्रमण करणाऱ्या बाजार समितीलाही उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला असता. संचालक मंडळ, शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी समन्वय साधल्यास हे बाजार एक सक्षम पर्याय होऊ शकते. 

मार्च महिन्याच्या अखेरीला कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर सुमारे तीन महिने सर्व व्यवहार ठप्प झाले. या कालावधीत शेत मालाच्या वाहतुकीला, विक्रीला परवानगी होती; परंतु चंदगडच्या शेतकऱ्याला सर्वात जवळची बेळगाव बाजार समिती दीर्घ काळ बंद राहिली. बेळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्याने व्यवहार सुरू करण्याला बंधने होते. आंतरराज्य वाहतुकीला बंदी असल्याचाही परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागला.

या काळात लग्नसराई, यात्रांचा हंगाम आणि हॉटेलसाठी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची गरज विचारात घेऊन शेतकऱ्यांनी बिनीस, ओली मिरची, बटाटा, फ्लॉवर, कोबी आदी भाजीपाल्याचे उत्पादन घेतले होते; परंतु बाजारपेठेअभावी ते जाग्यालाच कुजून गेले. याच काळात कोल्हापूर, सिंधुदूर्ग, गोवा यांसारखा विभाग ग्रीन झोनमध्ये होता. शासनाच्या परवानगीने या विभागात भाजीपाल्याची वाहतूक आणि विक्री करणे शक्‍य होते.

तत्पूर्वी तुर्केवाडी आवारात भाजीपाल्याची आवक करून तिथून हा माल गरजेनुसार त्या-त्या विभागात पाठवता आला असता. शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचे पैसे मिळाले असते, व्यापाऱ्यांना लाभ झाला असता आणि बाजार समितीलाही उत्पन्न मिळाले असते; परंतु सुरवातीपासूनच या आवाराकडे दुर्लक्ष असल्याने त्याला गती घेता आली नाही. कोरोनामुळे मात्र या आवाराचे महत्त्व सिद्ध केले आहे. 

अध्यक्षपद चंदगड तालुक्‍याकडेच 
यापुढील काळाचा विचार करता बाजार समितीच्या संचालक मंडळाने लक्ष घालणे गरजेचे आहे. स्थानिक शेतमालाची आवक याच आवारात व्हावी, यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे, खरेदीसाठी व्यापाऱ्यांना उद्युक्त करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. सध्या या समितीचे अध्यक्षपद चंदगड तालुक्‍याकडेच आहे. त्यामुळे त्यांनी हा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Billions Of Rupees Worth Of Farm Produce Wasted In Chandgad Taluka Kolhapur Marathi News