
भाषणाच्या सुरवातीपासून अखेरपर्यंत माझेच नाव त्यांच्या तोंडात असते
नेसरी - दिवसभरात दहा वेळा माझ्या नावाचा जप केल्याशिवाय मंत्री जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ यांना झोप लागत नाही. त्यांच्या भाषणाच्या सुरवातीपासून अखेरपर्यंत माझेच नाव त्यांच्या तोंडात असते. चंद्रकांत पाटलांना शिव्या घातल्या म्हणजे शरद पवारांकडे महत्त्व वाढते, म्हणूनच हे दोघेही माझ्यावर बोलण्याची संधी सोडत नाहीत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे लगावला.
येथे पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख, शिक्षक मतदारसंघाचे भाजप पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
श्री. पाटील म्हणाले, की पुणे पदवीधर मतदारसंघाचा १२ वर्षे मी आमदार होतो. गेली पाच वर्षे मंत्री असताना पदवीधर, शिक्षकांचे अनेक प्रलंबीत प्रश्न मार्गी लावले आहेत. विकासाची परंपरा पुढे नेण्यासाठी पुणे पदवीर मतदारसंघाचे उमेदवार देशमुख, शिक्षक उमेदवार जितेंद्र पवार यांना पहिल्या पसंतीचे मतदान करून विजयी करा. बारा वर्षात मी पदवीधर व शिक्षकांचा विकास साधला आहे. तरीसुद्धा विरोधक माझ्यावर टीका करून पवार यांच्यासमोर महत्व वाढवून घेत आहेत.’’
हे पण वाचा - ‘जुनं ते सोनंच: जुने दरवाजे, खिडक्यांनी घराला वेगळा साज!
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. हेमंत कोलेकर यांनी स्वागत केले. प्रदेश सरचिटणीस शिवाजी पाटील, मारूती राक्षे, जयश्री तेली, नामदेव पाटील, नाथाजी पाटील, विठ्ठल पाटील, अनिल खोत, संदीप नाथबुवा, संतोष तेली, प्रकाश गुरव, आदी उपस्थित होते.
संपादन - धनाजी सुर्वे