'हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री करा' : धनंजय महाडिक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 August 2020

धनंजय महाडिक; कोरोनाचा संसर्ग रोखण्यात पालकमंत्री सतेज पाटील अपयशी
 

कोल्हापूर : एप्रिलमध्ये जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण ५० पेक्षा कमी होते. ही संख्या आता १२ हजारांवर गेली आहे. निष्क्रिय आणि अपयशी पालकमंत्र्यांच्या कारभारामुळे ही स्थिती झाल्याची जनतेची भावना आहे. म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांच्याकडून पालकमंत्रिपद काढून घ्यावे आणि मदत करण्याची इच्छा असणाऱ्या हसन मुश्रीफ यांना पद द्यावे, अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य व माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढत्या लोकप्रियेतेमुळे काँग्रेस कार्यकर्ते गर्भगळित झाल्याची टीकाही त्यांनी केली आहे. युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज महाडिक यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. त्या पार्श्‍वभूमीवर महाडिक यांनी हे पत्रक दिले आहे.

हेही वाचा- कागल तालुक्यातील अर्जुनीचे नृसिंह मंदिर प्रादेशिक पर्यटन क्षेत्र होणार -

लॉकडाऊनचा फटका अर्थव्यवस्थेला बसणार हे स्पष्ट दिसत होते. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी सर्वसामान्य घटकांसह सर्वच क्षेत्रांना मदतीचा हात दिला. त्यानुसार देशाच्या जीडीपीच्या दहा टक्के अर्थात २० लाख कोटीचे आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केले. विशेष म्हणजे त्याची अंमलबजावणी तातडीने सुरू झाली. परिणामी देशाला महामारीची झळ तुलनेने कमी बसली आहे. शेवटच्या घटकापर्यंत मदत पोचल्याने सर्वजण समाधानी आहेत, असे पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा- ऑनलाइन शाळा सॉफ्टवेअरचे कागलमध्ये अनावरण -

राम मंदिर निर्माणाचे कार्य सुरू केल्याने, देशातील जनतेची मने मोदी यांनी जिंकली आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियेतेचा विरोधकांनी धसका घेतला असून, विशेषत: काँग्रेस कार्यकर्ते गर्भगळित झाले आहेत म्हणूनच आत्मनिर्भर पॅकेजबाबत बालिश सवाल उपस्थित करून आंदोलनाचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे; पण पॅकेजबाबत माहितीचा फलकच लावला असल्याने काँग्रेसच्या आंदोलनाचा फज्जा उडाल्याचा दावा त्यांनी केला.

हेही वाचा- इचलकरंजीतील एवढी खासगी रुग्णालये केली आरक्षित...कशासाठी..? वाचा सविस्तर... -

 

लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न
राज्यात कोल्हापूर जिल्हा कोविडचा हॉटस्पॉट आहे. रोज १५ ते २० बळी आणि ५०० हून अधिक बाधित होत आहेत. रुग्णांसाठी बेड नाही, ऑक्‍सिजनची कमतरता, जेवणात अळ्या, वाढीव वीजबिलांमुळे जनता हैराण आहे. त्याच वेळी बाजार समितीमधील नोकरभरती घोटाळा, घरफाळा घोटाळा यावर पालकमंत्र्यांकडून उत्तर दिले जात नाही. सर्व काही आलबेल असल्याचा भास निर्माण करण्यात ते मश्‍गुल आहेत. म्हणूनच या प्रश्‍नांवर उत्तरे देण्याऐवजी जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आंदोलनाचा फार्स केल्याची टीका महाडिक यांनी केली आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP state executive member and former MP Dhananjay Mahadik demand for Make Hasan Mushrif the Guardian Minister