भूतनाथ डोंगरावर पिडा टाळण्यासाठी ग्रामस्थांनी दिला चांगलाच चोप

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

पहाटे करणीबाधा करणारे दोन जण डोंगरावर आढळून आल्यावर त्यांना चांगलाच चोप देण्यात आला

खानापूर (बेळगाव) : गेल्या काही दिवसांपासून गणेबैलजवळच्या भूतनाथ डोंगरावर करणीबाधेचे प्रकार वाढीस लागल्याने झाडअंकले, माळअंकले आणि गणबैलमधील ग्रामस्थ त्रस्त झाले होते. या प्रकाराला कंटाळून गावपाळण करून ही पिडा टाळण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी गत महिन्यात केला होता. तरीही हे प्रकार थांबले नव्हते. आज पहाटे करणीबाधा करणारे दोन जण डोंगरावर आढळून आल्यावर त्यांना चांगलाच चोप देण्यात आला.

खानापूर-बेळगाव महामार्गावरील गणेबैलजवळील भूतनाथाचा डोंगर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. रोज शेकडो पर्यटक याठिकाणी येतात. डोंगरावर भूतनाथाचे मंदिर आहे. काही दिवसांपासून मंदिरात काळ्या बाहुल्या लटकवल्या जात असल्याची बाब स्थानिकांच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातून सुटका करून घेण्यासाठी परिसरातील गावांनी काही दिवस गावपाळण केली. तरीही काळ्या बाहुल्यांचा हा खेळ बंद झाला नव्हता. आज नेहमीप्रमाणे माळअंकलेतील काही जण पहाटे भूतनाथाची पूजा करण्यासाठी डोंगरावर गेले असता दोघे मांत्रिक त्याठिकाणी काहीतरी करणीबाधा करून मंदिरात काळ्या बाहुल्या बांधत असल्याचे आढळून आले.

हेही वाचा- राजकारणातील उगवता ‘सूर्य’

स्थानिक तरुणांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना चांगला चोप दिला. त्यात हिंडलगा, बेळगावमधील एकासह तालुक्‍यातील अन्य एकाचा समावेश आहे. चांगला समाचार घेतल्यावर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला नव्हता.

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: black magic perpetrators on Bhootnath mountain