बिनविरोध गावात मतदानादिवशी झाले रक्तदान

रणजित कालेकर
Saturday, 16 January 2021

गावच्या विकासासाठी पेद्रेवाडीमधील राजकीय गट एकाच जाजमावर आले. त्यांनी सुकाणू समिती स्थापन करून गावची निवडणूक बिनविरोध केली.

भादवण : गावच्या विकासासाठी पेद्रेवाडीमधील राजकीय गट एकाच जाजमावर आले. त्यांनी सुकाणू समिती स्थापन करून गावची निवडणूक बिनविरोध केली. आज मतदानाचा दिवस असताना त्यांनी रक्तदान करून एकीचे दर्शन घडवले. रक्तदान शिबिरात सुमारे 50 जणांनी रक्तदान केले. त्यांच्या या विधायक उपक्रमाची चर्चा तालुक्‍यात जोरात सुरू आहे. 

शिबिराचे उद्‌घाटन माजी सरपंच लताताई उत्तम रेडेकर व अंकिता पोल्ट्री समूहाचे अध्यक्ष, उद्योजक उत्तम रेडेकर यांच्या हस्ते झाले. सुकाणू समिती व ग्रामपंचायतीतर्फे हा उपक्रम झाला. केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय गडहिंग्लज व अर्पण ब्लड बॅंक कोल्हापूर यांचे सहकार्य मिळाले. निवडणुकीमुळे गावात राजकीय वातावरण तापते. एकमेकांमध्ये हेवेदावे, ईर्षा, द्वेष निर्माण होतो. याचा परिणाम गावच्या विकासावर होतो.

हे टाळले जावे, विकासासाठी राजकीय नेत्यांनी ग्रामस्थांना बरोबर घेऊन प्रयत्न करावेत, यासाठी सर्व जण एकत्र आले. त्यांनी निवडणूक बिनविरोध केली व राजकीय ईर्षा टाळली. आज मतदानादिवशीच त्यांनी रक्तदान शिबिर घेऊन अनोखा उपक्रम राबविला. 50 जणांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. या वेळी केदारी रेडेकर शिक्षण समूहाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, शिवसेनेचे आजरा तालुका पूर्व विभागाचे प्रमुख सुनील डोंगरे, शामराव लोहार, लक्ष्मण गाडे, सागर कबीर, नितीन कातकर व सुकाणू समितीचे सदस्य, पोलिसपाटील अनिल कातकर, नूतन सदस्य प्रकाश ढवळे, अशोक लोहार, राजश्री डोंगरे, सीमा चव्हाण, धनाजी डोंगरे उपस्थित होते. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blood Donation Was Done On Polling Day In Pedrewadi Kolhapur Marathi News