अरेरे...कोरोना पॉझिटिव्हचा मृतदेह न्यावा लागला डंपरमधून... गडहिंग्लजमध्ये असे काय झाले वाचा सविस्तर 

अजित माद्याळे
Friday, 14 August 2020

कोरोना बाधिताचा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या मृतदेहावरील अंत्यविधी खबरदारी घेत संबंधित यंत्रणेकडून होणे आवश्‍यक असताना गडहिंग्लज भागात मात्र वेगळेच चित्र पहायला मिळाले.

गडहिंग्लज : कोरोना बाधिताचा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या मृतदेहावरील अंत्यविधी खबरदारी घेत संबंधित यंत्रणेकडून होणे आवश्‍यक असताना गडहिंग्लज भागात मात्र वेगळेच चित्र पहायला मिळाले. नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील एका व्यक्तीचा बुधवारी (ता. 12) कोरोनाने मृत्यू झाला. त्या मृतदेहावर अंत्यविधी करण्याची जबाबदारी यंत्रणेची असताना ऐनवेळी कोणीच आले नसल्याने अखेर शहरातील एका नगरसेवकासह काही स्वयंसेवकांची मदत घेवून नातेवाईकांनीच मृतदेहावर अंत्यविधी केला. यावरून पॉझीटीव्ह रूग्णाच्या मृतदेहावरील अंत्यविधी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे किती राम भरोसे आहे, हेच स्पष्ट होते. शिवाय कोरोना पॉझीटीव्हचा मृतदेह नेण्यासाठी वाहन उपलब्ध नसल्याने मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे पालिकेच्या डंपरमध्ये घालून मृतदेह नेण्यात आला. 

नेसरीतील एका 60 वर्षीय व्यक्तीला तीव्र लक्षणे दिसत असल्याने त्यांची बुधवारी सकाळी अँटीजेन टेस्ट केली. त्यात ते पॉझीटीव्ह आले. त्यांना ऑक्‍सीजनची गरज भासल्याने कोविड केंद्रात दाखल केले. तेथे फिजीशियनही नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रात्री या रूग्णाचा मृत्यू झाला. वास्तविक पॉझीटीव्ह मृताच्या संपर्कात कोणी येवू नये व त्याच्यापासून कोणाला बाधा होवू नये म्हणून सर्व खबरदारी घेत अंत्यविधी करण्याच्या सूचना आहेत. त्याची अंमलबजावणीही सर्वत्र सुरू आहे. परंतु, गडहिंग्लज भागात याबाबतचे चित्र वेगळेच पहायला मिळाले. 

नेसरीतील व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यविधीही याच पद्धतीने होणे आवश्‍यक होते. परंतु, पॉझीटीव्हचा हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर नातेवाईक हडबडले. गर्भगळीत झाले. त्यांना काहीच सुचेनासे झाल्याने त्यांनी नगरसेवक महेश कोरी यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांना फोन लावला. श्री. कोरी यांनी इम्रान मुल्ला, ताहीर कोचरगी, शुभम मैत्री, मुबारक नदाफ, वसीम मुल्ला, जाफर तपकीरे, मुरसल नदाफ, हुमायूँ जमादार, अफरीद जमादार, साईल सौदागर यांना घेवून कोविड केंद्राकडे रवाना झाले. त्याचवेळी केंद्रातील एकजण येवून 'बॉडी पॅक करू की तशीच देवू", अशी विचारणा केली. त्यावेळी श्री. कोरी यांनी त्याला मृत्यूचे कारण विचारल्यानंतर 'कोरोना' असे उत्तर आले. 

साहजिकच कोरोनाचा मृतदेह प्लास्टिकमध्ये बंदीस्त करून देण्याची सूचना असताना या प्रश्‍नाने सारेच चकीत झाले. या प्रश्‍नावर संताप व्यक्त केल्यानंतर मृतदेह बंदीस्त करून दिला. मृतदेहाला नेसरीपर्यत न्यायचा कसा हा प्रश्‍न पडला. अखेर पालिकेच्या सहकार्याने एका वाहनातून मृतदेह नेसरीतील दफनभूमीपर्यंत नेण्यात आला. श्री. कोरी व सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे पीपीई किट घालून नातेवाईकांनीच मृतदेह दफन केला. दरम्यान, गेल्या आठवड्यात गडहिंग्लजमधील एका कोरोना योद्‌ध्याच्या निगेटीव्ह रिपोर्ट आलेल्या मृतदेहावरही अंत्यविधी करताना याच स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला होता. 

वाहन उपलब्ध नाहीच 
प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे विचारपूस केल्यानंतर कोरोना पॉझीटीव्हचा मृतदेह नेण्यासाठी वाहन उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे पालिकेच्या डंपरमध्ये घालून मृतदेह नेण्यात आला. मृतदेह सोडून परत निघायच्या मानसिकतेत स्वयंसेवक होते. परंतु, तेथे कोणीच नव्हते. यामुळे नातेवाईकांनी पाणावलेल्या डोळ्यांनीच स्वयंसेवकांना 'तुम्ही जावू नका',अशी विनवणी केल्याने दफनविधीनंतर ते बाहेर पडले. 

...तर मृतदेहाची हेळसांड नशीबी? 
कोविड केंद्राकडे फिजीशियन नसल्याने 'ऑन कॉल' पद्धतीने फिजीशियनशी चर्चा करून अत्यवस्थ कोरोना रूग्णावर औषधोपचार सुरू असल्याचे समजते. मृतदेह नेण्यासह अंत्यविधीसाठीही यंत्रणा नसल्याचे स्पष्ट झाले. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना याबाबत सूचना असतानाही नेसरीतील अंत्यविधीवेळी कोणीही फिरकले नाही. अखेर गडहिंग्लजमधून गेलेल्या स्वयंसेवकांच्या मदतीमुळे मृताच्या संपर्कातीलच नातेवाईकांनी हे धाडस केले. अन्यथा मृतदेहाची हेळसांड नशीबी आली असती. 

संपादन - सचिन चराटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Body Of Corona Positive Had To Be Taken From The Dumper Restricted Areas Kolhapur Marathi News