गणेशमूर्तीच्या डोळ्यांत जिवंतपणा आणण्यात बोलबाला

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 August 2020

शंकर पुरेकर यांनी मूर्तिकलेचा बारकाईने अभ्यास केला. मूर्ती आकर्षक, देखणी व चैतन्यमय असावी, यावर त्यांचा नेहमी भर राहिला. भक्तांनी मूर्तीसाठी आपल्यालाच पसंती द्यावी, यावर त्यांचा कटाक्ष राहिला. जादा मूर्ती करताना त्यात गुणवत्तेला त्यांनी प्राधान्य दिले

कोल्हापूर : पापाची तिकटी जोशी गल्लीतील शंकर पुरेकर शाडूच्या मूर्ती करण्यात मास्टर. भक्तांच्या मागणीनुसार प्लास्टरच्या मूर्तीही ते करतात. दोन्ही प्रकारांतील मूर्तींसाठी त्यांच्याकडे मागणी ठरलेली असते. दरवर्षी सुमारे हजारांवर मूर्तींना ते आकार देतात. मूर्तीच्या डोळ्यांत जिवंतपणा आणण्यात त्यांचा बोलबाला आहे. पुरेकर कुटुंबीयांची चौथी पिढी पारंपरिक व्यवसाय गुंतली आहे. त्यांच्या मूर्ती केवळ कोल्हापूर शहरातच नव्हे, तर पर जिल्ह्यातही रवाना होतात. यंदा कोरोनाने अनेक मूर्तिकारांच्या बुकिंगवर पाणी फिरले असले तरी पुरेकर कुटुंबीय त्याला अपवाद ठरले आहे. 
शंकर पुरेकर यांनी मूर्तिकलेचा बारकाईने अभ्यास केला. मूर्ती आकर्षक, देखणी व चैतन्यमय असावी, यावर त्यांचा नेहमी भर राहिला. भक्तांनी मूर्तीसाठी आपल्यालाच पसंती द्यावी, यावर त्यांचा कटाक्ष राहिला. जादा मूर्ती करताना त्यात गुणवत्तेला त्यांनी प्राधान्य दिले. आजही ते मूर्ती करण्यात थकत नाहीत. त्यांचा मुलगा गणेश तीस वर्षे या व्यवसायात आहे. 
त्यांचे लालबागचा राजा, तटाकडील, बजापरा माजगावकर मंडळाचे पॅटर्न फेमस आहेत. सहा इंच ते अडीच फुटांपर्यंत ते मूर्ती करतात. विशेषतः बैठ्या मूर्ती करताना मूर्तीचे दागिने व मुकुट यात दरवर्षी ते वेगळेपण असावे, याचा प्रयत्न करतात. पुरेकर कुटुंबीयातील महिलाही मूर्तीचे काम करण्यात पुढे आहेत. गणेश यांची पत्नी मूर्तीना रंग देण्यात कमी पडत नाही. स्प्रे गन बॉडी शेडिंगमध्ये त्यांचा चांगलाच हात बसलाय. रंगकामात पुरेकर कुटुंबीयांचे नाव तर आहेच, शिवाय मूर्तीत जिवंतपणा आणण्याचे काम ते उत्कृष्ट पद्धतीने करतात. त्यांच्या मूर्ती भक्तांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत. 
कोकण, कराड, सातारा, मुंबई, सांगली, बेळगावमध्ये त्यांच्या मूर्ती पाठविल्या आहेत. शेवटच्या टप्प्यातील काम त्यांचे सुरू आहे. सुमारे शंभर मूर्तींना रंग देण्याचे काम लगबगीने सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता 15 ऑगस्टपासून भक्तांना मूर्ती नेण्यासाठी ते आवाहन करणार आहेत. 
गणेश पुरेकर म्हणाले, "यंदा कोरोनाचे सावट व्यवसायावर असले तरी मूर्तीतील जिवंतपणामुळे भक्तांकडून मूर्ती बुकिंग झाल्या आहेत. शासकीय नियमांचे पालन करून त्यांना आम्ही मूर्ती देणार आहोत.' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bolbala in bringing vitality in the eyes of Ganesha idol