लॉकडाउनमध्ये 'पुस्तक तुमच्या दारी' उपक्रम राबवणारे असं हे वाचनालय

मतीन शेख
Saturday, 23 January 2021

रामकृष्ण-विवेकानंद वाचनालयाचे वाचन संस्कृतीला बळ...

 

कोल्हापूर - वाचन माणसाचं जगणं समृद्ध करते, पुस्तके हीच ज्ञान साधनेची शिडी असते, परंतु कोरोना महामारीच्या काळात वाचनालये, पुस्तकालये, अभ्यासिकांना टाळे लागले. नागरिक घरातच लॉकडाउन झाल्याने ते पुस्तकांपासून दूर होते. परंतु या कठीण काळातही शिये (ता.करवीर) येथील श्री. रामकृष्ण-विवेकानंद वाचनालयाने वाचन संस्कृतीला बळ देण्याचे काम केले.ज्येष्ठ नागरिकांना घरपोच पुस्तके पुरवण्यापासून ते लहान मुलांसाठी विशेष अभ्यासिकांचे आयोजन वाचनालयाकडून केले जात आहे.

कोरोनाच्या भीतीपोटी आठ महिने लोक घरात बंद राहिले. शाळा, कॉलेजसह सर्व काही बंद होते. या काळात ज्येष्ठ नागरिक, अभ्यासक, शिक्षक तसेच विद्यार्थी पुस्तकांपासून दुरावले होते. वाचन चळवळीत 23 वर्षांची परंपरा असलेल्या श्री. रामकृष्ण-विवेकानंद वाचनालयाने या काळात 'पुस्तक तुमच्या दारी' ही संकल्पना राबवत वाचकांपर्यत पुस्तके पोहचवण्याचा प्रयत्न केला. वापरलेली पुस्तके सॅनिटाईज करणे, मास्कचा वापर करणे असे कोरोना प्रतिबंधित उपाययोजनांचे पालन केले होते. या काळात तब्बल 1000 पुस्तकांची देव घेव पूर्ण करून या अस्वस्थ काळात लोकांच्या ज्ञानाची भूक भागवण्याचे काम वाचनालयाकडून झाले. अनलॉकनंतर दर शनिवारी विद्यार्थ्यांसाठी विशेष वाचनकट्टा आयोजन होत असल्याने अभ्यासापासून दूर असलेले विद्यार्थी अभ्यासाच्या प्रवाहात आले आहेत. सोशल डिस्टंन्सचे पालन करत या अभ्यासिकांचा प्रयोग होत आहे. वाचनालयाकडून गावातील कोरोना योद्‌ध्यांचा सत्कारही झाला.

विद्यार्थी दत्तक योजना राबविणार...

वक्‍तृत्व स्पर्धा, शैक्षणिक साहित्य वाटप, ग्रंथ प्रदर्शन, व्यसनमुक्ती शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण कार्यक्रम, निबंध स्पर्धा घेण्यात येतात. काही दिवसात अनाथ, गरजू, होतकरू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना राबवण्याचा मनोदय वाचनालय मंडळाचा आहे. वाचनालयाचे ग्रंथपाल मनोज ठोंबरे काम पाहतात.

वाचनालयात 7000 पेक्षा अधिक पुस्तकांचा संग्रह आहे. वाचन मनुष्याला ज्ञानी करते. वाचनालयातर्फे वाचन चळवळीबरोबरच समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करतो. ग्रामस्थांच्या सहकार्याने वाचनालयाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे.
- लक्ष्मण कदम, अध्यक्ष, रामकृष्ण-विवेकानंद वाचनालय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Book at your Doorstep initiative in Lockdown at shiye kolhapur